एखाद्या पक्षाला एखादी जागा मिळाली तर.., आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत सतेज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं
By पोपट केशव पवार | Published: June 24, 2024 02:14 PM2024-06-24T14:14:29+5:302024-06-24T14:16:37+5:30
'बिद्री कारखान्यावरील कारवाई चुकीची'
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताच वाद असणार नाही. एकमेकांना सांभाळून घेऊन पुढे जाऊ. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जागांवरून कोणतीही अडचण येणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आमदार पाटील म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणे हे आमचे ध्येय आहे. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा याचा निर्णय इंडिया आघाडी एकत्रित घेईल. कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपावरून कोणतीही अडचण येणार नाही. एकमेकांना सांभाळून घेऊन आम्ही पुढे जाऊ. एखाद्या पक्षाला एखादी जागा मिळाली तर तो इच्छुक त्या पक्षातून उभा राहील.
बिद्रीवरील कारवाई चुकीची
शाहू छत्रपती भुदरगडच्या दौऱ्यावर असताना के. पी. पाटील यांनी प्रचंड उत्साहात त्यांचे स्वागत केले. त्याचे पडसाद उमटले की नाही हे मला माहीत नाही. मात्र, बिद्रीवरील झालेली कारवाई चुकीची आहे. बिद्री कारखाना ६५ हजार शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. शेतकऱ्यांची संस्था अडचणीत आणून कोणी यात राजकारण करत असेल तर ते चुकीचे असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
प्रत्येक शक्तिपीठाला पाच हजार कोटी द्या
शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असून असलेल्या ठिकाणी महामार्ग गरजेचा नाही. सरकारला शक्तिपीठांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी प्रत्येक शक्तिपीठाला पाच पाच हजार कोटी रुपये देऊन त्या भोवतालचा परिसर विकसित करावा. तिथे येणाऱ्या भाविकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पाहता राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याची टीकाही त्यांनी केली.