अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्राला ठेंगा, तुटपुंज्या तरतुदी; जलसिंचन योजनांना तरतुदी नाहीतच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:05 PM2023-03-10T12:05:32+5:302023-03-10T12:06:17+5:30
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ यासाठी कोणतीही तरतूद नाही
कोल्हापूर : राज्य शासनाने गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्रासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. बजेटमध्ये दक्षिण महाराष्ट्रातील विकास प्रकल्प कागदावरच राहणार आहेत. यामुळे विकासाची गतीही मंदावणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाटबंधारे प्रकल्प, जलसिंचन योजनांना तरतुदी नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, शहरातील व जिल्ह्यातील रस्ते प्रकल्प, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ, शिवाजी विद्यापीठ सुवर्ण महोत्सव निधी यासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.
सांगली, सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील पाटबंधारे प्रकल्प, जलसिंचन योजनांसाठीही काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी अर्थसंकल्पात दक्षिण महाराष्ट्राला ठेंगा दाखविण्यात आला आहे.
कोल्हापूरला हे मिळाले
- जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणासाठी ५० कोटी
- कोल्हापूर आणि गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी ११५ कोटी.
- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टरची घोषणा
- कोल्हापूर आणि ठाणे येथे अत्याधुनिक मनोरुग्णालयासाठी ८५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- चंदगड, आजरा येथे काजू बोंडावरील प्रक्रिया उद्योग उभारणार
सांगलीला हे मिळाले
- सांगली येथे नाट्यगृह बांधण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद
साताऱ्याला हे मिळाले
- सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकामाला गती देणार
- वाई येथील विश्वकोश इमारत बांधकामाला गती देणार