मंडलिक-माने यांना बदलायचे कारण नाही, पण..; खासदार धनंजय महाडिकांचे सुचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 04:50 PM2023-08-17T16:50:37+5:302023-08-17T16:51:09+5:30
भाजपने येणाऱ्या लोकसभेसाठी पक्षाच्या आदेशाप्रमाणे तयारी सुरू केली
कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे सध्याचे खासदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. सध्या शिंदे गट, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि आम्ही भाजप एकत्र आहोत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला हे दोन्ही उमेदवार बदलायचे तसे काही कारण वाटत नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे सांगितले. मात्र याचा निर्णय दिल्लीतच होणार, हे सांगायला ते विसरले नाहीत.
संसदेतील कामगिरीबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांना आगामी लोकसभा उमेदवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, अजून लोकसभेसाठी वेळ आहे. परंतु सध्या दोन्ही खासदार शिंदे गटाचे आहेत. हे दोघेही विद्यमान असल्याने त्यांना बदलण्याचे तसे कारण दिसत नाही. परंतु शेवटी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नियोजन करतील आणि त्याबाबतचा निर्णय दिल्लीत होईल.
प्रत्येक पक्ष उमेदवारीसाठी आग्रही असतो. त्याप्रमाणे अनेक मागण्याही होत आहेत. परंतु अंतिम निर्णय हा दिल्लीतच होणार आहे. भाजपने येणाऱ्या लोकसभेसाठी पक्षाच्या आदेशाप्रमाणे तयारी सुरू केली आहे.