धरणाला जमीन देऊन आम्ही उपाशी; वरची गावे मात्र तुपाशी
By भीमगोंड देसाई | Published: August 7, 2023 04:53 PM2023-08-07T16:53:06+5:302023-08-07T16:54:22+5:30
आंबेओहळ धरणाची स्थिती : वर्षापूर्वी पूर्ण, अजूनही पुनर्वसन अपूर्ण
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : दीर्घकाळ अर्धवट राहिलेले आजरा तालुक्यातील आंबेओहळ धरण वर्षापूर्वी पूर्ण झाले. मात्र, अजूनही सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. या धरणाच्या पाण्याचा फायदा घेणारे शेतकरी तुपाशी आणि धरणासाठी जमीन दिलेले शेतकरी उपाशीच राहिले आहेत. पुनर्वसनासाठी शासकीय यंत्रणेकडे हेलपाटे मारून त्यांच्या चपला तुटत आहेत.
आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा आहे. तरीही आंबेओहळ धरणातील सर्व बाधीत शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. धरणाला सन १९९८ मध्ये मंजुरी मिळाली. तब्बल २३ वर्षांनी धरण पूर्ण झाले. राजकीय इच्छाशक्ती, रखडलेल्या पुनर्वसनासह विविध कारणांनी अनेक वर्षे धरणाचे काम अपूर्ण राहिले होते. गेल्या वर्षी धरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण अजूनही शंभर टक्के पुनर्वसन झालेले नाही.
धरणाचे नाव : आंबेओहळ, ता. आजरा.
धरणासाठी ५१४ शेतकऱ्यांची जमिनी
धरणासाठी ५१४ शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पोलिस बळाचा वापर करून जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या आहेत.
मोबदला मिळाला अन् खर्चही झाला
जमीन धरणात गेल्याने मोबदल्यापोटी २२ कोटी ६६ लाख वाटप करण्यात आले आहेत. मात्र, अनेकांचे पैसे विविध कारणांसाठी खर्च झाले आहेत.
धरणाच्या पाण्याखालचे क्षेत्र किती ?
प्रकल्प पाणीसाठ्याची क्षमता १२५० द.ल.घ.फू. इतकी आहे. यातून गडहिंग्लज तालुक्यातील २६१५ हेक्टर, तर आजरा तालुक्यातील १३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
१३२ शेतकऱ्यांचे पुनर्वसन प्रलंबित
धरणासाठी जमिनी दिलेल्या ५१४ पैकी १३२ शेतकऱ्यांचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही. त्यांनी पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. पण, त्यांचे पुनर्वसन बेदखलच केले आहे.
धरण उशाला, कोरड घशाला
धरणात पाणी साठत आहे. मात्र, ते उपसून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याची योजना नाही. लाभक्षेत्रातील सर्व जमिनीला पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. धरणापासून जवळ असलेल्या गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण होते.