आमदार झाल्याशिवाय माघार नाही, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटलांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 01:33 PM2022-10-24T13:33:03+5:302022-10-24T13:33:30+5:30
हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे
सोळांकूर : कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता आपल्यावर प्रेम करणाऱ्या शेवटच्या कार्यकर्त्यालाही विश्वासात घेऊन येत्या चार दिवसांत योग्य तो निर्णय घेईन. कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आमदार झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी गर्जना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी सोळांकूर (ता. राधानगरी) येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
ए.वाय. पाटील म्हणाले, २७ वर्षांच्या राजकारणात सातत्याने कार्यकर्त्याला मोठे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी आमदार व्हावे, ही तमाम कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यासाठी आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पक्षाच्या वाढीसाठी अतोनात प्रयत्न करूनही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडगाव येथील कार्यक्रमात विधानसभेच्या उमेदवारीची परस्परच घोषणा केल्याने आपल्याला दुःख झाले. आमच्या मेव्हण्या- पाहुण्यांच्या वादासमोर हसन मुश्रीफ यांनीच हात टेकल्याचे वक्तव्य केल्याने मी निराश झालो असून आता योग्य निर्णय घेण्याचा आपल्यावर कार्यकर्त्यांचा दबाब आहे.
बिद्रीचे माजी संचालक नेताजी पाटील म्हणाले, ए.वाय. पाटील यांनी सामान्य कार्यकर्त्यांना अनेक संस्थांमध्ये काम करण्याची संधी दिली. मात्र, नेतृत्वाने सातत्याने त्यांचे खच्चीकरण केले. राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडल्यावर मोठ्या पदावर जातात हा जिल्ह्याचा इतिहास आहे, असे ते म्हणाले. यावेळी गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत ए.वाय. यांना वेळोवेळी सामंज्यस्याची भूमिका घेऊन माघार घेतली. आता माघार नाही.
भिकाजीराव एकल, शिवाजीराव पाटील, नेताजीराव पाटील, अशोक साळोखे, दीपक पाटील, मारुती बारड, बाळासो कामते, संग्राम कदम आदींची भाषणे झाली. मेळाव्यास युवराज वारके, एकनाथ पाटील, सचिन पाटील, वाय.डी. पाटील, अतुल नलवडे, फिरोजखान पाटील, धनाजी पाटील, मानसिंग पाटील, विरेंद्र देसाई, डी.जी. पाटील, संजीवनी कदम, मोहन पाटील, नाना पाटील, रामभाऊ इंगळे उपस्थित होते.
त्यांना मी हनुमानासारखी साथ दिली
१९९५ पासून मी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत सारथ्याची भूमिका पार पाडली. प्रत्येकवेळी मला ते यावेळी मी निवडणूक लढवतो, पुढील वेळी तुम्हाला संधी देतो, असा शब्द द्यायचे; परंतु, प्रत्येकवेळी माझी फसवणूक झाली. अंगावरील हळद निघण्यापूर्वीच मला पद्धतशीर बाजूला केले गेले. रामभक्त हनुमानाप्रमाणे साथसोबत करूनही आपल्यावर दरवेळी अन्यायच झाल्याचे त्यांनी यावेळी माजी आ. के.पी. पाटील यांचे नाव न घेता केला.
हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे
आपल्यावर अन्याय झाला हे सत्य असून याबाबत सर्व वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली आहे. यानंतर समोरून प्रत्युत्तर आल्यास त्यालाही उत्तर देण्यास मी समर्थ असून आज मी आपल्यासमोर मांडले तो फक्त ट्रेलर आहे.
मुश्रीफांनी हात टेकले, मग मी कोणाकडे बघू
माझ्या राजकीय जीवनात मुश्रीफ यांनी मला आधार दिला. तेच माझे मायबाप आहेत. आमच्या मेव्हण्या- पाहुण्यांच्यात समेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु, या वादासमोर हसन मुश्रीफ यांनीच हात टेकल्याने मग मी कोणाकडे बघू,अशी अगतिकताही पाटील यांनी व्यक्त केली.