Kolhapur: जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सहीच्या आदेशाबद्दल गांभीर्यच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:58 IST2025-02-06T11:58:14+5:302025-02-06T11:58:31+5:30
नोकरभरतीचे रॅकेट : सीपीआर, पोलिस प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

Kolhapur: जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सहीच्या आदेशाबद्दल गांभीर्यच नाही
कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सहीने नोकरीचे आदेश निघाले असतानाही याचा तपास करून खरा प्रकार उघडकीस आणण्याबद्दल सीपीआरची यंत्रणा गंभीर नसल्याचे दिसत आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन १५ दिवस झाले तरी यातील नेमका दोषी समोर आलेला नसून लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे आणि सीपीआर प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या सह्या असलेले दोन बोगस नियुक्ती आदेश घेऊन दोघेजण सीपीआरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी आले होते. गायत्री जयवंत वारके यांना लिपिकपदी तर दिलीप गणपती दावणे यांना शिपाई पदावर सीपीआरमध्ये नियुक्त घ्यावे, अशी शिफारस आयुक्त, जिल्हा विभाग रुग्णालय कोल्हापूर यांना करण्यात आली असून यावर येडगे आणि मोरे यांच्या बोगस सह्या आहेत.
याबाबत सीपीआर प्रशासनाने २१ जानेवारीला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. परंतु १५ दिवस होत आले तरी ही पत्रे नेमकी कुणी दिली हे उघडकीस आलेले नाही. जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्याची सही बोगस होते आणि तरीही तपास होत नाही हे गौडबंगाल कळेनासे झाले आहे.
पालकमंत्र्यांनी सांगूनही पुढे काहीच नाही
जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना या बोगस आदेशांबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी तातडीने तपास करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. परंतु त्यानंतरही पुढे काही झालेले नाही.
आम्ही सीपीआर प्रशासनाकडे या प्रकरणातील मूळ आदेशांची मागणी केली आहे. त्यांनी व्हॉटसअॅपवरील स्क्रीन शॉट दिले आहेत. बनावट आदेशाची सीपीआरकडे अर्जासोबतचा जोडलेला मूळ बनावट आदेश मिळाल्यानंतर तातडीने तपास केला जाईल. - श्रीराम कणेरकर, पोलिस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे
आमच्याकडे दोन्ही मुले नियुक्तीचे जे पत्र घेऊन आली त्याचीच प्रत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली आहेत. हा कागद वगळता आमच्याकडे एकही कागद नाही. - डॉ. शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक सीपीआर रुग्णालय