Kolhapur Politics: महायुतीत स्थानिक पातळीवर दिलजमाई नाहीच, आमदार-खासदार श्रेयवाद रंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:59 IST2025-02-27T18:59:34+5:302025-02-27T18:59:57+5:30

‘सुळकूड’ निष्क्रियतेची जबाबदारी कोण घेणार?

There is no sympathy at the local level in the mahayuti, there is a rivalry between Ichalkaranjit MLA Rahul Awade and MP Darishsheel Mane | Kolhapur Politics: महायुतीत स्थानिक पातळीवर दिलजमाई नाहीच, आमदार-खासदार श्रेयवाद रंगला

Kolhapur Politics: महायुतीत स्थानिक पातळीवर दिलजमाई नाहीच, आमदार-खासदार श्रेयवाद रंगला

अतुल आंबी

इचलकरंजी : शहरातील एखादे विकासकाम मंजूर झाल्यास विद्यमान आमदार आणि खासदार यांच्या प्रसिद्धी विभागाकडून हे काम आपणच मंजूर करून आणल्याचे प्रसिद्धी पत्रक दिले जाते. याबाबत समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर तिखट प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे. त्यामध्ये मंजूर असतानाही अंमलबजावणी न होणाऱ्या सुळकूड पाणी योजनेच्या निष्फळतेची अशीच जबाबदारी घेतली जाईल का, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. निवडणुकीपूर्वी घडणारा श्रेयवादाचा प्रकार पुन्हा सुरू झाल्याने महायुतीतील स्थानिक पातळीवर अद्याप दिलजमाई झाली नाही, हे स्पष्ट होते.

आयजीएम रुग्णालयात नर्सिंग कॉलेज मंजूर झाले. हे काम आपणच पाठपुरावा करून मंजूर करून आणले असल्याचे आमदार राहुल आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या प्रसिद्धी विभागाकडून पत्रक काढण्यात आले. त्यामध्ये एकमेकांची नावे दिली नाहीत. किंवा महायुतीतील राष्ट्रवादीच्याही कोणाचे नाव घेतले नाही. त्यामुळे शहरवासीयांनी हे काम नेमके कोण मंजूर केले, असा प्रश्न समाजमाध्यमांवर उपस्थित केला आहे.

महायुतीच्या माध्यमातून सर्वांच्या नावाने एकत्र प्रेसनोट दिली जाणे संयुक्तिक ठरणार आहे. मात्र, दोन्ही गटातील अंतर्गत धुसफूस कायम असल्याने श्रेयवादाचा प्रकार घडत आहे. आमदार आवाडे यांच्या पत्रकात माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे, तर माने यांच्याकडून खासदार माने, आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचे प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

दोन्हींकडील पत्रकात महायुतीतील कोणत्याच घटक पक्षाचा उल्लेख नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांच्यात दिलजमाई झाली नसल्याचे दिसते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घडलेल्या राजकीय घडामोडींचा अद्याप ‘समतोल’ झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये कशी राजकीय खेळी रंगणार, याकडे लक्ष लागले आहे.

सल्ल्याने फरक पडेल का?

केलेल्या कामाचे श्रेय घेण्यास हरकत नाही. मात्र, ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनी घ्यावे. अथवा संयुक्त प्रयत्न असतील, तर संयुक्तपणे प्रसिद्धी द्यावी, असे सल्लेही अनेकांनी समाजमाध्यमांवर दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात यातून काही फरक पडतो का, हे पाहावे लागेल.

संयुक्त समितीची गरज

भाजपमध्ये प्रकाश आवाडे- सुरेश हाळवणकर असे प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी कोअर समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन्ही माजी आमदार, विद्यमान आमदार, भाजप व ताराराणीचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे महायुतीमध्ये एकसंधपणा राहण्यासाठी भाजप, आवाडे गट, माने गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या प्रमुखांची संयुक्त समिती गरजेची आहे.

Web Title: There is no sympathy at the local level in the mahayuti, there is a rivalry between Ichalkaranjit MLA Rahul Awade and MP Darishsheel Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.