कळे येथे चार वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग
By admin | Published: September 25, 2014 01:05 AM2014-09-25T01:05:54+5:302014-09-25T01:28:52+5:30
अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल : संतप्त ग्रामस्थांकडून गाव बंद ; कळे-गगनबावडा रस्ता रोखला
कळे/कोल्हापूर : कळे (ता.पन्हाळा) येथील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग केल्याच्या संशयावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आज, बुधवारी रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बालिकेच्या गुप्तांगामध्ये एखादी विशिष्ट वस्तू घातल्याने अतिरक्तस्राव झाल्याचा अहवाल ‘सीपीआर’च्या डॉक्टरांनी पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी आई-वडिलांनी तक्रार दिली नसली तरी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे यांनी स्वत: फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज गाव बंद ठेवून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दोषींना अटक केल्याशिवाय शाळा सुरू करू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
कळे (ता. पन्हाळा) येथील अंगणवाडीतील चार वर्षांची मुलगी शाळेच्या स्वच्छतागृहात काल, मंगळवारी लघुशंकेसाठी गेली असता तिच्यावर एका नराधमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या अंगावर किरकोळ जखमा असल्याच्या अंगणवाडी सेविकेंच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पीडित मुलीला दाखल केले. तेथून तिला कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये उपचारासाठी पाठविले. आज, बुधवारी ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी अंगणवाडी बंद करून सेविकांना ग्रामपंचायतीमध्ये चौकशीसाठी आणले. तेथे त्यांची कसून चौकशी केली; पण ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने त्यांनी सर्व शिक्षण संस्था व कळे गावातील व्यवहार बंद पाडले. तेथून युवकांचा मोर्चा कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर येऊन रास्ता रोको आंदोलन केले.
घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील, सरपंच संगीता पोवार, उपसरपंच रामचंद्र इंजुळकर, पंचायत समिती सदस्या भारती पाटील, पन्हाळा पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, शाहूवाडी पोलीस उपअधीक्षक किसन भ. गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) शिल्पा पाटील हे ग्रामपंचायतीमध्ये जमले व त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून घटनेची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी जमलेल्या जमावाला शांत राहण्याचे आवाहन आमदार चंद्रदीप नरके, राजू सूर्यवंशी, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, शाहू काटकर, बाळासाहेब मोळे यांच्यासह कळे गावातील ज्येष्ठांनी केले. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ‘सीपीआर’मध्ये जाऊन बालिकेच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्यांनी आमची मुलगी पडून जखमी झाली आहे, आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही, असे सांगितले. आई-वडील तक्रार देत नसल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला.
दरम्यान, पोलिसांनी ‘सीपीआर’च्या डॉक्टरांकडे बालिकेच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यामध्ये बालिका काल, मंगळवारी रात्री दहा वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सीपीआरच्या वैद्यकीय अहवालानुसार पोलीस उपनिरीक्षक आठरे यांनी स्वत: फिर्यादी होऊन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी पन्हाळा पोलिसांकडे वर्ग केला. (प्रतिनिधी)