हद्दवाढ करावीच लागेल
By Admin | Published: March 8, 2016 12:58 AM2016-03-08T00:58:26+5:302016-03-08T01:00:38+5:30
चंद्रकांतदादा : कोणती गावे घ्यावीत अन् घेऊ नये हाच वादाचा मुद्दा
कोल्हापूर : शहराची हद्दवाढ करावीच लागणार आहे. फक्त कोणती गावे घ्यावीत अन् कोणती घेऊ नयेत. दोन्ही एमआयडीसी घ्याव्यात की नको एवढा एकच मुद्दा वादाचा आहे; परंतु यासंदर्भात शहरी आणि ग्रामीण जनता यांच्यात संघर्ष होणार नाही याची खबरदारी बाळगून राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून राज्यसरकार काही गावे व दोन एमआयडीसी वगळून हद्दवाढ करण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या दोन्ही बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी आपली आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, शहराची हद्दवाढ होणार यात कसलीच अडचण वाटत नाही. फक्त किती गावे घ्यावीत, एमआयडीसी घ्याव्यात की नकोत, हे मुद्दे चर्चेतून पुढे आले आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, सांगली या शहरांच्या हद्दवाढी दोन-चारवेळा झाल्या आहेत. मग कोल्हापूर शहराची हद्दवाढ का नको, अशी विचारणा नगरविकास विभागाने केली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सहा-सात गावे वगळून का होईना हद्दवाढ करावीच लागेल. औद्योगिक वसाहती या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका हद्दीत असू नयेत त्यासाठी स्वतंत्र टाउनशीप करण्याचा कायदा १९७२ मध्ये झाला आहे. त्यामुळे दोन्ही औद्योगिक अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार सोमवारी वसाहतीसाठी वेगळा विचार करावा लागणार आहे. दोन-तीन मुद्दे सोडले तर हद्दवाढ करण्यात अडचण नाही तरीही सर्वांना विश्वासात घेऊन संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेत
निर्णय घ्यावा लागणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. शहरवासीयांचे नुकसान नको : नरवणकर
दरम्यान, उच्च न्यायालयात दाखल झालेल्या हद्दवाढ जनहित याचिकेचे काम पाहिलेले अॅड. युवराज नरवणकर हे स्वत: पालकमंत्री पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीस उपस्थित होते.
यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की, शहराच्या हद्दवाढीसाठी राज्य सरकारने आतापर्यंत कायदेशीर प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे आधी अधिसूचना काढा, त्यावर हरकती मागवा आणि मग हरकतींची छाननी करून योग्य निर्णय घ्या, अशी कायद्याची अपेक्षा आहे. राज्य सरकार हे कायदे मंडळ असते.
त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा, असे अपेक्षित नाही. सरकार सारासार विचार करून निर्णय घेऊ शकते. तो त्यांचा अधिकार आहे. दुर्दैवाने हा लढा ‘कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर’ असा सुरू असून त्यात शहराचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षाही अॅड. नरवणकर यांनी व्यक्त केली.
मिरवणुकीवर निर्णय नाही
हद्दवाढीचा निर्णय घ्या, तुमची हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे हद्दवाढ कृती समितीने, तर हद्दवाढीचा प्रस्ताव रद्द करा, आम्हीही तुमची उंटावरून
मिरवणूक काढतो, असे विरोधी कृती समितीने पालकमंत्र्यांना सांगितले.
त्याचा संदर्भ देत पालकमंत्री पाटील म्हणाले की, माझी हत्तीवरून मिरवणूक काढली जाणार आहे किंवा नाही यावर निर्णय होणार नाही. त्यामुळे कोणाच्या हत्तीवरून जायचे की उंटावरून जायचे, हा माझ्या समोरचा प्रश्नच नाही.
जो निर्णय होणार आहे, तो वास्तवाला अनुसरून होईल. अद्याप हद्दवाढीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे आतापासूनच कोणी आंदोलन करू नये.
काही गावे
वगळून हद्दवाढ
शहराची हद्दवाढ करताना पाच गावे आणि दोन एमआयडीसी वगळल्या जाऊन उर्वरित गावांना शहर हद्दीत समाविष्ट करून घेतली जाण्याची शक्यता पालकमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ठळक
झाली आहे.
\