प्रगतीसाठी आरक्षण मिळालेच पाहिजे
By Admin | Published: October 13, 2016 02:05 AM2016-10-13T02:05:58+5:302016-10-13T02:06:50+5:30
अंजली साळवी : आरक्षणाअभावी प्रगती नाही
कोल्हापूर : गुणवत्ता असताना देखील मराठा तरुण-तरुणींची शैक्षणिक आणि नोकरीच्या ठिकाणी आरक्षण नसल्याने नेहमीच पिछाडी होत आहे. त्यामुळे प्रगतीसाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे, असे मत सीमंतिनी मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अंजली साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
डॉ. साळवी म्हणाल्या, ‘मराठा म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच मराठा,’ अशी ओळख आहे.
आपला मराठा समाज क्षत्रिय म्हणून नावाजलेला पण, या समाजाच्या उन्नतीकडे मराठा समाजाचे नेते, राज्यकर्त्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे या समाजाला प्रगतीचे ठोस असे कुठलेच साधन उपलब्ध नाही.
बहुतांश मराठा हा शेती व्यवसाय करतो. शेतीला हमीभाव मिळत नसल्याने समाजासमोर तीव्र स्वरूपात आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना उच्चशिक्षण घेता येत नाही. त्याचा परिणाम समाजाच्या प्रगतीवर झाला आहे. छत्रपती शिवराय यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या मावळ्यांनी महाराष्ट्राचे अस्तित्व कायम ठेवले. हे अस्तित्व कायम ठेवणारे मराठेच होते. बदलत्या काळानुसार पुढच्या पिढीचा विचार करता, शिक्षणाची विविध दालने उभी केली. युवापिढी कष्टाने शिकत राहिली. आरक्षणाअभावी शिक्षणाचा उपयोग मात्र, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण दाखवू शकला नाही. त्याचा परिणाम ही युवा पिढी मानसिकदृष्ट्या खचली. आरक्षण मिळविण्यासह स्त्री सन्मानाची जाणीव करून देण्यासाठी मराठा समाजाने क्रांती मूक मोर्चाद्वारे पाऊल टाकले आहे. झळ बसल्याने तरुणाईच अधिक पेटून उठली आहे मराठा समाजातील खदखद लक्षात घेऊन मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक पाऊल टाकले पाहिजे.
लढा शांततेच्या मार्गाने
मराठा समाजाने न्याय मागण्यांसाठी क्रांती मूकमोर्चाद्वारे शांततेच्या माध्यमातून लढा उभारला आहे. ‘आता नाही, तर कधीच नाही’ हे या भूमिकेतून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आता मराठा समाज अन्याय सहन करणार नाही, असे
डॉ. साळवी म्हणाल्या. समाजातील महिला बदलत्या काळानुसार घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडल्या आहेत. शिक्षण घेतल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग समाज व स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्या नोकरीच्या शोधात बाहेर पडल्या; परंतु, क्षमता असून आरक्षणाअभावी योग्य नोकरी नाही.
स्वतंत्र महामंडळ हवे
मराठा समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ सुरू करावे. त्यांच्यासाठी विशेष सवलती जाहीर करून त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. महिलांसाठी विशेष आरक्षण दिले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या मागे पडलेल्या मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा प्राप्त होईल. या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण महत्त्वाचे आहे.
भूमिका मराठा
शिलेदारांच्या