पाणी, पार्किंग समस्यांवर ‘उत्तर’ नाही
By admin | Published: December 26, 2014 11:08 PM2014-12-26T23:08:54+5:302014-12-26T23:44:39+5:30
तत्पर नगरसेविका : विकसित होत असलेल्या भागात रस्त्यांचा प्रश्न; वाहनतळाची मागणी जोरात
कोल्हापूर : अवघी पाच हजारांची लोकसंख्या; पण तब्बल अडीच किलोमीटर परिसरात विभागलेला विरळ लोकवस्तीचा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक १९ शाहूपुरी (उत्तर) ओळखला जातो. व्यापारी पेठ, मुख्य रस्ते, दरवर्षी नव्याने होणारी बांधकामे, अपार्टमेंट, सतत भौतिक घडामोडींत असणाऱ्या या प्रभागात पाणी, रस्ते व पार्किंगची मोठी समस्या आहे. नगरसेविका मृदुला पुरेकर व माजी नगरसेवक रमेश पुरेकर सातत्याने लोकसंपर्कातून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असले, तरी पार्किंग व पाण्याच्या समस्येवर ‘उत्तर’ शोधण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सीपीआर चौकापासून या प्रभागास सुरुवात होते. सीपीआर ते संपूर्ण स्टेशन रोडवरून ट्रेड सेंटर, कोरगावकर कंपौंड व महावीर कॉलेज चौक, वंडर इलेव्हन ते सीपीआर चौक असा स्टेशन रोडच्या उत्तरेचा भाग व्यापलेला असा हा प्रभाग आहे. प्रभागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नव्या इमारती व बांधकामे होत असतात. नव्याने वसणाऱ्या सोसायट्या व अपार्टमेंट यांना रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा पुरविण्यासह जुन्या मतदारांकडे लक्ष देण्याची कसरत पुरेकर यांना करावी लागते.
संपूर्ण प्रभागास कसबा बावडा, कावळा नाका, ताराबाई पार्क व कोकणे मठ या चार पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होतो. चार ठिकाणांहून कमी-अधिक दाबाने अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने संपूर्ण प्रभागात पाण्याची मोठी समस्या आहे. नियमित व वेळेत पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी आहे. संपूर्ण स्टेशन रोडवर पार्किंगची व्यवस्था नाही. यामुळे बहुतांश वाहने रस्त्यांवरच थांबून असतात. नव्याने होणाऱ्या अपार्टमेंट व इमारतींच्या पार्किंगकडे नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
महावीर कॉलेज रस्त्यावरील वंडर इलेव्हनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने बांधकामे सुरू आहेत. याठिकाणी नव्याने उच्चभू्र वस्ती होत असून येथे रस्ते व पथदिव्यांचा अभाव असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मृदुला पुरेकर यांनी रस्तेबांधणीसह जुन्या रस्त्यांच्या डागडुजीकडे लक्ष दिल्याचे दिसते. नव्या कॉलनीत वीज, पाणी व रस्तेबांधणीची योजना आखली आहे. महावीर उद्यानामध्ये मिनी ट्रेन सुरू केली असून, वॉकिंग ट्रॅकचा प्रश्न मार्गी लावला. गेली तीन वर्षे मिनी ट्रेन सुरू असून, लहान मुलांना मोफत सफर घडविली जाते. कुटुंबासह विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या महावीर उद्यानाकडे पुरेकर जातीनिशी लक्ष देत असल्याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त आहे.
नवीन कॉलनीतील रस्तेबांधणी, महावीर गार्डनची डागडुजी, पाण्याची समस्या कमी करणे, तसेच वीज कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या खुल्या जागेत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्याचा येत्या दहा महिन्यांत प्रयत्न राहणार आहे. रस्ते, वीज व पाण्याची नव्या व जुन्या कॉलनीत अग्रक्रमाने सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. - मृदुला पुरेकर, नगरसेविका
प्रतिबिंब प्रभागाचे--प्र.क्र. १९
(शाहूपुरी उत्तर)
संतोष पाटील