१२ हजारांहून अधिक नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:53+5:302021-05-13T04:24:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ज्या तालुक्यांमध्ये आणि कोल्हापूर महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना याच तालुक्यांमधून ...

There is no contact tracing of more than 12,000 citizens | १२ हजारांहून अधिक नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच नाही

१२ हजारांहून अधिक नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ज्या तालुक्यांमध्ये आणि कोल्हापूर महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना याच तालुक्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तीन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्तांना बुधवारी नोटीस काढण्यात आली.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे नियंत्रणाच्या प्रक्रियेमधील महत्त्वाचे मानले जाते. गेल्यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात या कामाने वेग घेतला होता; परंतु यंदा मात्र गावपातळीवरील अनेक मर्यादांमुळे ही प्रक्रिया मंदावली आहे. ज्या पद्धतीने यावर्षी ग्राम समित्याही सक्रिय नाहीत त्याच पद्धतीने काही तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही वेगाने केले जात नाही. त्यामुळे नवे संशयित शोधून त्यांचे स्वॅब घेण्यावर मर्यादा येत आहेत. परिणामी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

याबाबत जिल्हा परिषदेच्या पातळीवर अधिक छाननी केली असता कोल्हापूर महापालिका आणि जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अजूनही वेगाने होत नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी महापालिका उपायुक्त निखिल मोरे, करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले, हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, शिरोळचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना नोटीस काढली.

चौकट

तालुका पातळीवरच्या अडचणींवर चर्चाच नाही

एकीकडे अधिकाऱ्यांना नोटीस काढली जात असताना दुसरीकडे तालुका पातळीवर त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत जिल्हा प्रशासन निर्णय घेत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी वाहनांची अडचण, जवळच्या संपर्कातील नातेवाइकांना नेण्यासाठी वाहने आणि चालकांची अनुपलब्धता, निधीची अडचण अशा अनेक बाबींना स्थानिक अधिकाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

चौकट

तालुकानिहाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग न झालेले रुग्ण

कोल्हापूर महापालिका : ८१६३

करवीर : १२६१

हातकणंगले : १८१०

शिरोळ : १०३३

एकूण : १२, २६७

चौकट

याच तालुक्यांमध्ये वाढते रुग्ण

कोल्हापूर शहरासह करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांमध्येच कोरोनाचे रुग्ण प्रचंड संख्येने वाढत आहेत. त्यामुळे याची दखल घेण्यात आली असून तातडीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. खरोखरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग राहिले आहे की ती माहिती अपलोड करणे बाकी आहे, याचीही माहिती घेतली जात आहे.

Web Title: There is no contact tracing of more than 12,000 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.