‘गडहिंग्लज’करांच्या हिताविरूद्ध निर्णय नाही
By Admin | Published: April 12, 2017 12:18 AM2017-04-12T00:18:50+5:302017-04-12T00:18:50+5:30
नगराध्यक्ष कोरी यांची ग्वाही : नगरपालिकेची बदनामी न करण्याचे आवाहन
गडहिंग्लज : रिंगरोड सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित करण्यासंबंधीचा कोणताही ठराव झालेला नाही. त्यामुळे डी नोटीफिकेशनद्वारे नागरिकांवर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा करतानाच आपल्या कारकीर्दीत शहरातील नागरिकांच्या हिताविरूद्ध कोणताही निर्णय होणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांनी सोमवारी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील राज्य महामार्गावरील दारू दुकाने बंद झाली आहेत. ती दुकाने पुन्हा सुरू होण्यासाठी डी. नोटीफिकेशनच्या हालचाली सुरू असल्याचा येथील नागरिकांचा आरोप होता. त्याला विरोध दर्शविण्यासाठी रिंग रोड परिसरातील नागरिक निवेदन घेऊन पालिकेत आले होते. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र, नागरिकांच्या हिताविरूद्ध कोणताही निर्णय घेतलेला नसतानाही झालेल्या घोषणाबाजीबाबत नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नगराध्यक्ष म्हणाल्या, २०१५ मध्ये रिंगरोडसंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनच सर्व्हे होऊन तो शासनाकडे सादर झाला आहे. त्याच्याशी पालिकेचा कोणताही संबंध नाही. शहराच्या हद्दीतील कडगाव आणि भडगाव रस्ता व गटारींची डागडुजी करता यावी यासाठी नागरिकांच्या तक्रारीमुळेच ते दोन्ही रस्ते ताब्यात देण्याची मागणी पालिकेने केली आहे. मात्र, त्याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.
हद्दवाढ कृती समितीचे प्रमुख डॉ. एम. एस. बेळगुद्री, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, दत्ता देशपांडे व राजेंद्र पाटील यांनी नागरिकांची बाजू मांडली. त्यानंतर नगराध्यक्षांना
निवेदन देण्यात आले. नागरिकांना विश्वासात न घेता रिंगरोडच्या
मालकी हक्क हस्तांतरीत करण्यासंबंधीचा एकतर्फी कोणताही ठराव करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कोणताही ठराव नाही
रिंगरोडचा ताबा ‘सार्वजनिक बांधकाम’कडे देण्यासंबंधीचा कोणताही ठराव झालेला नसतानाही डी नोटीफिकेशनद्वारे दारू दुकानदारांना पाठीशी घातले जात असल्याचा गैरसमज पसरवून पालिकेची व नगरसेवकांची सुरू असलेली बदनामी थांबवा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रा. कोरी यांनी यावेळी केली.
गडहिंग्लज येथे नगराध्यक्ष स्वाती कोरी यांना नागाप्पा कोल्हापुरे, बाळासाहेब हिरेमठ, डॉ. एम. एस. बेळगुद्री, दत्ता देशपांडे, राजेंद्र पाटील व नागेश चौगुले यांनी निवेदन दिले. यावेळी क्रांतीदेवी शिवणे, नाज खलिफा, राजेश बोरगावे व बसवराज खणगावे, आदी उपस्थित होते.