यावर्षीही गणेश विसर्जन मिरवणूक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:29 AM2021-08-19T04:29:17+5:302021-08-19T04:29:17+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध कायम ...
कोल्हापूर : कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध कायम आहेत. त्यामुळे कोणत्याही मिरवणुकीशिवाय यंदाही गणेश विसर्जन इराणी खणीत होईल, अशी माहिती महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत असताना कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रशासक बलकवडे यांनी बुधवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, शहरात घरगुती गणपती मूर्ती किमान दोन फुटांची, तर सार्वजनिक मंडळांनी चार फुटांपर्यंतच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. घरगुती मूर्ती या शाडूच्या असाव्यात. पंचगंगा नदीचे प्रदूषण होणार नाही, मिरवणुकीमुळे संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. यंदाही शहरातील पंचगंगा नदी, रंकाळा, कळंबा, राजाराम तलाव येथे मूर्ती विसर्जन केले जाणार नाही. सर्व मूर्तींचे इराणी खणीतच विसर्जन केले जाणार आहे.
विसर्जन प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून शहरातील प्रत्येक प्रभागात किमान दोन ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड उभे केले जाणार आहेत. त्याठिकाणी मूर्ती विसर्जित कराव्यात. विसर्जित मूर्तींचे नंतर महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत इराणी खणीत पुन्हा विसर्जन केले जाईल. सार्वजनिक मंडळांनी गणेश मंडप छोटे उभारावेत, संपूर्ण रस्ता अडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शहरातील श्रींचे आगमन व विसर्जन कालावधीमध्ये गणेशोत्सव मार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्यावरील खरमाती, दगडाचे ढीग, अतिक्रमणे व इतर अडथळे काढण्याच्या सूचना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिल्या. सार्वजनिक रस्त्यांवरील व विसर्जन ठिकाणी लाइटची व्यवस्था ठेवण्याच्या सूचना सहायक विद्युत अधीक्षकांना दिल्या. यावेळी उपायुक्त रविकांत अडसूळ, निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घार्गे, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे उपस्थित होते.
-स्पर्धेचे आयोजन -
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून स्वच्छता स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेचे स्वरूप, त्याचे निकष दोन-चार दिवसांत निश्चित केले जाणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
दहीहंडी होणार नाही-
राज्य शासनाने संपूर्ण राज्यात दहीहंडी साजरी करण्यावर निर्बंध लादले आहेत, त्यामुळे कोल्हापूर शहरातही दहीहंडी सार्वजनिक ठिकाणी साजरी करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे बलकवडे यांनी स्पष्ट केले.