ग्रामीण भागात रॉकेल उपलब्ध नसल्याने विक्री केंद्रांवर वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:47 PM2018-09-07T23:47:31+5:302018-09-07T23:47:35+5:30
राधानगरी : दुहेरी अनुदान खर्च होत असल्याच्या कारणावरून राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकेवर मिळणारे रॉकेल एलपीजी गॅसधारकांना देण्यास पूर्ण मनाई केल्याने ग्रामीण भागात लोकांची मोठी गैरसोय होत आहे. खुल्या बाजारातही रॉकेल उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे रॉकेल विक्री केंद्रांवर वादाचे प्रसंग होत आहेत.
कधी काळी नोंदणी केल्यावर गॅस जोडणी मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागत होती. शिवाय याची वितरण व्यवस्था फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी होती. त्याचा दर, ने-आण करणे म्हणजे मोठे दिव्यच होते. परिणामी, अगदी मोजक्या लोकांच्याकडे अशा जोडण्या होत्या. गेल्या काही वर्षांत मात्र यात मोठी क्रांती झाली आहे. अनेक ठिकाणी एलपीजी गॅस सेवा केंद्रे सुरू झाली आहेत. शासनाच्या विविध योजनांतून सहजपणे या जोडण्या उपलब्ध होत आहेत. मागील तीन ते चार वर्षांत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, शासनाचा रॉकेलचा खर्च निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. अशी जोडणी असणाऱ्यांना सवलतीच्या दरात मिळणारे रॉकेल बंद केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर यातून पळवाट शोधून त्यांना थोडेफार रॉकेल दिले जात होते.
गेल्या महिन्यापासून यातील पळवाटच बंद करण्यात आली आहे. शिधापत्रिकेवर मिळणारे धान्य जसे पॉस मशीनद्वारे आधार क्रमांक लिंक झाल्यावर त्याची पडताळणी होऊनच मिळते, तसेच आता रॉकेलसुद्धा या प्रकारे वाटप करण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीने होणारी रॉकेलची विक्री बंद झाली आहे. याबरोबरच सर्वच शिधापत्रिकाधारकांना घरात गॅसजोडणी नसल्याबाबत तलाठी यांच्यासमोर केलेले हमीपत्र द्यावे लागत आहे. यात खोटी माहिती दिल्यास कारवाई करण्याचा उल्लेख आहे.
आॅगस्ट महिन्यात नेहमीप्रमाणे कोटा उपलब्ध झाला आहे. मात्र, गॅसजोडणी नसल्याची खात्री करूनच रॉकेल वाटण्याच्या सूचना असल्याने त्याचे वाटप झालेले नव्हते. ते सुरू झाल्यावर गावागावांत मोठ्या प्रमाणात वादावादी होत आहे. शासनाच्या धोरणानुसार रॉकेल हे केवळ स्वयंपाक तयार करण्यासाठी इंधन म्हणून दिले जाते. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून एलपीजी गॅसजोडणी दिल्याने रॉकेलचा वापर करण्याची गरज नाही. मात्र, ग्रामीण भागात विजेचा खोळंबा झाल्यावर उजेडासाठी रॉकेलच्या दिव्याचा वापर केला जातो. अजून पावसाचे दिवस असल्याने वीज वारंवार खंडित होते.
अंत्यसंस्कारास अत्यावश्यक
गावातील शाळा, अंगणवाड्या, सहकारी संस्था यांना रॉकेल मिळणे बंद झाले आहे. विशेष म्हणजे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना चिता पेटविण्यासाठी अजूनही रॉकेलशिवाय पर्याय नाही. अनेक ठिकाणी स्मशानशेड नाहीत. त्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्कार केले जातात. पावसाळ्यात ओली लाकडे पेटण्यासाठी रॉकेल अत्यावश्यक आहे. मात्र, यापुढे सवलतीच्या दरातील रॉकेल मिळणे कठीण असल्याने अंत्यसंस्काराच्या खर्चात वाढ होणार आहे.