पुनर्वसनासाठी जमीन नाही
By admin | Published: November 17, 2014 12:32 AM2014-11-17T00:32:19+5:302014-11-17T00:36:45+5:30
बोरपाडळे ग्रामस्थ : आज धरणग्रस्त जमिनीचा ताबा घेणार
देवाळे : बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील गायरान गट क्र.३३७ मधील साडेसात एकर जमीन चांदोली धरणग्रस्तांना दिली आहे. ती त्यांना कोणत्याही परिस्थितीत देऊ देणार नाही, असा इशारा ग्रामपंचायत व ग्रामस्थ बोरपाडळे यांनी अर्जाद्वारे दिला आहे. उद्या, सोमवारी पोलीस बंदोबस्तात धरणग्रस्त या जमिनीचा ताबा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोरपाडळे ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सर्व ग्रामस्थ व कब्जाला जनआंदोलनाद्वारे कडक विरोध करणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोरपाडळे येथील बोरपाडळे-कोडोली रस्त्याला लागून असलेली गायरानमधील (गट क्र. ३३७) साडेसात एकर जमीन १९९८ साली कुल्याचीवाडी (ता. शाहूवाडी) येथील चांदोली अभयारण्याग्रस्तांसाठी वाटप करण्यात आली. एकूण ३८ कुटुंबे याठिकाणी सुमारे दोन महिने राहिली. पाण्याची सुविधा, डोंगराळ जागा व इतर सुविधा नसल्याने या लाभार्थ्यांनी ही जागा नाकारली. त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यात आले. यासंदर्भात ग्रामपंचायतीमार्फत संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. त्यासाठी उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी १९ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. परिस्थिती नाजूक बनलेली आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, असा इशाराही देण्यात आला आहे. (वार्ताहर)
१९९८ ते आॅगस्ट २०१४ पर्यंत याच ३८ लाभार्थ्यांच्या नावावर सातबारा असणारी हीच जमीन सप्टेंबर २०१४ मध्ये पाच चांदोली धरणग्रस्तांच्या नावावर झाली. ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीर व घाईगडबडीत केली असून, ग्रामपंचायत व ग्रामस्थांना या प्रक्रियेत विचारात घ्यायला हवे होते, असे ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ यांनी म्हंटले आहे.