‘गणेशोत्सव म्हणजे डॉल्बी’ अशी मानसिकता नको
By admin | Published: August 24, 2016 11:17 PM2016-08-24T23:17:18+5:302016-08-24T23:47:43+5:30
डॉ. आरती परुळेकर यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.
मांगल्य, उत्साहाचा सण असणाऱ्या गणेशोत्सवात गेल्या काही वर्षांपासून डॉल्बीच्या त्रासाने शिरकाव केला आहे. वर्षागणिक त्यात वाढ होत असून, समाजाला ते अधिक त्रासदायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर डॉल्बीमुळे कानासह शरीराच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम, याबाबत घ्यावयाची दक्षता, आदी संदर्भात कान, नाक व घसा तज्ज्ञ आणि डॉल्बीविरोधात गेल्या आठ वर्षांपासून प्रबोधन करणाऱ्या
डॉ. आरती परुळेकर यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.
प्रश्न : डॉल्बी विरोधातील प्रबोधनाची तुम्ही सुुरुवात कशी केली?
उत्तर : सन २००७ मध्ये गणेशोत्सवानंतर २१ वर्षीय मुलगा ऐकू येत नसल्याचे सांगत माझ्याकडे उपचारासाठी आला. यावेळी उपचारासाठी त्याची माहिती घेताना ३६ तास गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बीसमोर असल्याचे त्याने सांगितले. इतका कालावधीत तो डॉल्बीसमोर राहिल्याने त्याच्या कानांवर ध्वनीचा मोठ्या प्रमाणात आघात झाल्याने त्याची ऐकण्याची शक्ती कमी झाली. डॉल्बीचा हा दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर सामाजिक बांधीलकीच्या उद्देशाने मी डॉल्बीविरोधात प्रबोधनाची सुरुवात केली. निसर्गमित्र, ईएनटी असोसिएशन, जिल्हा पोलिस दल, आदी संस्थांच्या माध्यमातून डॉल्बीमुळे कानासह शरीरावर होणारे दुष्परिणामांबाबत तरुण मंडळांचे प्रबोधन करू लागले. मार्गदर्शनपर व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, ध्वनिप्रदूषणांवरील प्रबोधनपर पत्रके-पुस्तिकांचे वाटप, आदींद्वारे डॉल्बीला टाळण्याचे आवाहन केले. गेल्या आठ वर्षांपासून ते सातत्याने सुरू आहे.
प्रश्न : डॉल्बीमुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात?
उत्तर : माणसाचे कान हे बाह्य, मध्य आणि अंतकर्ण या तीन भागांमध्ये विभागलेले आहेत. त्यातील अंतकर्णात जी नस असते ती मेंदूपर्यंत जाते व श्रवणशक्तीचे ज्ञान देते. कानाची श्रवण क्षमता २० हर्टझ ते २० हजार हर्टझपर्यंत आहे. आपले नेहमीचे बोलणे ४० ते ६० डेसिबल असते. त्रास न होता आपली ऐकण्याची क्षमता ८० डेसिबल आठ तास, ९० डेसिबल सहा, ९५ डेसिबल ४, शंभर डेसिबल दोन, तर १०२ ते १०५ डेसिबल एक ते अर्धा तास इतका आहे. मोठे फटाके, डॉल्बीचा आवाज १०५ डेसिबलपासून पुढे असते. इतक्या मोठ्या ध्वनीचा आघात कानावर झाल्यास अंतकर्णातील श्रृतीतंतू कायमस्वरूपी निकामी होतात तसेच कानाचा पडदा फुटू शकतो. त्यामुळे बहिरेपणा, कानात दुखणे, आदी त्रास होतात. त्याचा दीर्घकालीन दुष्परिणाम होतो. कानात सतत आवाज येतो. श्रृतितंतूचा ऱ्हास झाल्याने कानात ‘सूँई सूँई’ अथवा लाटांसारखा आवाज येत राहतो. हा अंतर्नाद तात्पुरता अथवा कायमस्वरूपी असू शकतो. त्याला खात्रीलायक कोणतेही औषध नाही. तात्पुरता अथवा दीर्घकालीन बहिरेपणा जाणवू शकतो. कायमस्वरूपी बहिरेपणाला श्रवणयंत्राशिवाय पर्याय नाही. कानात दुखणे, निद्रानाश, मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता भंग होणे. हृदयाचे ठोके व रक्तदाब वाढणे. हृदयविकार असलेल्या रुग्णांना अॅटॅक येणे. गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्तींना त्रास होतो तसेच शरीरातील जैविक क्रियेवर परिणाम होतो. संबंधित दुष्परिणाम लगेच अथवा कालांतराने दिसतात. ज्यांना १०५ हून अधिक डेसिबल आवाज असणाऱ्या मिरवणुकांसह ठिकाणी जावे लागते. ज्यांना ते टाळता येत नाही, अशा व्यक्तींनी इयर मफ्स्, इयर प्लग्स्चा वापर करावा. ध्वनीच्या मोठ्या स्वरूपातील आघातामुळे त्रास जाणवू लागल्यास अशा ठिकाणांहून तातडीने दूर जावे तसेच डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.
प्रश्न : समाज, प्रशासनाच्या पातळीवर कोणते प्रयत्न झाले पाहिजेत?
उत्तर : समाजातील गटाने एकत्रितरीत्या डॉल्बीमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी जाणीव, जागृती, प्रबोधन केले पाहिजे. त्यांनी कृती कार्यक्रमात सहभागी व्हावे. गणेशोत्सवासाठी वर्गणीच्या माध्यमातून बहुतांश नागरिक मंडळांना मदत करतात. कोणत्याही मंडळाला वर्गणी देताना त्यांनी डॉल्बी लावू नये, असे प्रत्येक वर्गणीदाराने मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले पाहिजे. डॉल्बीचे समर्थन करून ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या मंडळांवर बहिष्कार टाकावा. जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलिसांनी ध्वनिप्रदूषणविषयक कायद्याची कडक स्वरुपात अंमलबजावणी करावी.
प्रश्न : तरुण मंडळांना काय आवाहन कराल?
उत्तर : मांगल्य व उत्साहवर्धक असणाऱ्या गणेशोत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा आहे. बहुतांश तरुण मंडळांनी या उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाची परंपरा जपली आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार या सामाजिक उत्सवामध्ये डॉल्बीद्वारे ध्वनिप्रदूषणाने शिरकाव केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ‘गणेशोत्सव म्हणजे डॉल्बी’ अशी मानसिकता काही मंडळांच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. डॉल्बीमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या त्रासासह दुष्परिणाम अधिक तीव्रतेने समाजाला जाणवू लागले आहेत. ते लक्षात घेता डॉल्बी वापराची मानसिकता मंडळांनी बदलली पाहिजे. तरुण मंडळांनी डॉल्बीला बगल देत ढोल-ताशे, झांजपथक, लेझीम पथक, धनगरी ढोल अशा विविध पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. त्यातून होणारी ध्वनीची निर्मिती डॉल्बीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमापेक्षा खूप कमी असते. त्यातून ध्वनिप्रदूषण कमी होते. उत्सव म्हटले की, जल्लोष झालाच पाहिजे; पण, हा जल्लोष समाजासह स्वत:ला घातक ठरणारा असू नये. स्वत:सह समाजाला घातक ठरणारा जल्लोष प्रत्येकानेच टाळण्याची गरज आहे. विधायक उपक्रमांनी उत्सव साजरा करण्यावर तरुण मंडळांनी भर द्यावा. या उत्सवाद्वारे विविध विषयांवरील प्रबोधनाची परंपरा त्यांनी अधिक भक्कम करून आपल्या शहराची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण करावी.
- संतोष मिठारी