...तर दरासाठी आंदोलनाची गरज नाही

By admin | Published: December 26, 2015 12:22 AM2015-12-26T00:22:32+5:302015-12-26T00:24:09+5:30

राजू शेट्टी : आजऱ्यात भात उत्पादकांचा मेळावा; शेतकऱ्याची बाजार, राजकारणावर हुकमत हवी

... there is no need for agitation for the rate | ...तर दरासाठी आंदोलनाची गरज नाही

...तर दरासाठी आंदोलनाची गरज नाही

Next

आजरा : छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कदापिही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली, तरीही शेतकऱ्यांची खळी लुटण्याची प्रवृत्ती कमी झाली नाही. ज्या दिवशी शेतकऱ्यांची शिवारात, बाजारात आणि राजकारण्यांवर एकाचवेळी नजर व हुकमत निर्माण होईल त्यादिवशी शेतकऱ्याला शेतीमालाच्या दरासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
स्वाभिमानी अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे तांदूळ विक्री प्रारंभ व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तांदूळ वाहतुकीचा प्रारंभ शेट्टी यांच्याहस्ते झाला.
शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारी मंडळी आपणाला अलीकडे सल्ला देऊ लागली आहेत. मुळातच शेतकऱ्यांनी विविध आंदोलनांमध्ये आपणाला इतके गुंतवून ठेवले आहे की, शेतकऱ्यांसाठीच्या अनेक कल्पना, योजना आपल्याकडे असूनही त्या राबविताना मर्यादा येत आहेत.
भविष्यात जी लढाई आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल ती बी-बियाणांसाठीची असेल. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्याजवळ जे नाही त्याबाबत दु:ख करीत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य वापर केल्यास त्यासाठी संघर्ष केल्यास बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण होईल. तसे झाल्यास सरकारकडून सकारात्मक निर्णय करवून घेणे शक्य होईल.
तांदूळ खरेदी-विक्री करण्याचे धोरण ‘स्वाभिमानी’ने अवलंबले आहे. मुळातच व्यापाऱ्यांनी आजरा घनसाळला बदनाम केले आहे. ‘स्वाभिमानी’ने विश्वासार्हता कमविण्यासाठी १५ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी घालविला आहे.
तांदूळ विक्री करताना ही विश्वासार्हता गमावली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सरकारचा
एक रुपयाचाही निधी न घेता
शेतकरी कंपन्या उभा करू शकतात. त्या चालवू शकतात हे दाखवून
द्यावे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट
केले.
यावेळी कॉ. संपत देसाई, तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत, नंदकुमार सरदेसाई, आजरा साखर कारखाना संचालक बयाजी मिसाळ, सखाराम केसरकर, उद्योजक महादेव पोवार, तुळसाप्पा पोवार, आबासाहेब पाटील, शिवाजीराव इंजल, शांताराम पाटील, बी. के. कांबळे यांच्यासह शेतकरी व ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन कृष्णा पाटील यांनी केले. माजी उपसभापती निवृत्ती कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

आंदोलनाच्या प्रवासातला मैलाचा दगड निखळला
शेतकरीवर्गासाठी आंदोलनाच्या प्रवासातला मैलाचा एक दगड शरद जोशी निखळला आहे.
भविष्यात राजू शेट्टीही निखळेल. शेतकऱ्यांनी आता स्वत: लढण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.
लढा चालूच राहणार आहे, असे भावनिक उद्गार खासदार शेट्टी यांनी काढले.

चांगली माणसे द्या
प्रामाणिकपणे गोठ्यातल्या औत ओढणाऱ्या बैलासारखी आपली अवस्था झाली आहे. एकाचवेळी किती जबाबदाऱ्या माझ्या एकट्यावर टाकाल.
आता बिनकामाचे बैल पोसणे बंद करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकीसाठी मला चांगली माणसे द्या व माझा भार हलका करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: ... there is no need for agitation for the rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.