kdcc bank election : बँकेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : महादेवराव महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 03:47 PM2022-01-05T15:47:56+5:302022-01-05T15:59:32+5:30
जिल्ह्याचे राजकारण हालवण्यासाठी मुंबईत रथी महारथी बसली आहेत, जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणारा मी कोण? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
कोल्हापूर : आतापर्यंतचा बँकेचा इतिहास पाहता अयोग्य व्यक्तीच्या हातात कधीच बँक गेली नाही. आताही कोणाच्या हातात सूत्रे जाणार हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही असे सांगत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्तारुढ आघाडीच्या विजयाचा दावा केला. जिल्ह्याचे राजकारण हालवण्यासाठी मुंबईत रथी महारथी बसली आहेत, जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणारा मी कोण? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
जिल्हा बँकेसाठी करवीर व कोल्हापूर शहरातील मतदान कोल्हापुरातील वि. स. खांडेकर प्रशालेत झाले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बँक निवडणुकीबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणावर भाष्य केले.
जिल्ह्याचे राजकारण मी कोण हलवणार, ते रथी महारथी मुंबईत बसले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणारा मी कोण? जसी परिस्थिती आहे तसे निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेत सुरु असलेल्या कामाची स्तुती देखील केली.
जिल्हा बँकेसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली होती. बँकेच्या 21 पैकी 6 जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. विकास संस्था गटातील सहा व इतर गटातील नऊ अशा 15 जागांसाठी निवडणूक लागली आहे. सत्तारूढ व परिवर्तन पॅनलमध्ये निकराची लढाई पाहावयास मिळत आहे. महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना विरोधी गटात आहे. तर भाजपने सत्तारुढ आघाडीला पाठिंबा दिला आहे.