कुणाचा ताळमेळ कुणाला नाही
By Admin | Published: November 8, 2016 01:06 AM2016-11-08T01:06:47+5:302016-11-08T01:29:58+5:30
बेकायदेशीर हस्तांतरण : कुपोषित मतिमंद मुले धुळे, मुंबईची
कोल्हापूर/बांबवडे : शित्तूर तर्फ मलकापूर येथील प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आधार विद्यालय या निवासी शाळेतील कुपोषणाने अत्यवस्थेत असलेल्या आणखी पाच गतिमंद मुलांना सोमवारी सीपीआरमध्ये दाखल केले.
या विद्यालयातील ३२ मुलांची सीपीआर रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांकडून सोमवारी पुन्हा तपासणी केली. यात पाच मुलांना अॅनेमियाची लागण झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठविल्याने पुन्हा या संस्थेतील इतर मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मोनीष भीमाप्पा (वय १६), गंगादीप राजकुमार (१२), राजनंदिनी केराट (१२), मंगल यानके (१४), छोटीगीता (१२) अशी त्यांची नावे आहेत. यामुळे मुलांची संख्या बारावर पोहोचली आहे. त्यात वाढ होण्याची शक्यता असून, गंगादीप राजकुमार व खुशी या दोन मुलांची जास्त काळजी आहे. अन्य मुलांची प्रकृ ती स्थिर आहे. त्यासाठी बालरोगतज्ज्ञ व औषध विभागाच्या तज्ज्ञांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शित्तूर (ता. शाहूवाडी) येथील गतिमंद निवासी शाळेतील गांधी (१५), खुशी (७) व कार्तिक (१०) या तिघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच दि. ५ रोजी गांधी याचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. उर्वरित दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना सोमवारी आणखी पाच मुले दाखल झाली. त्यांच्यावर बालरोगतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. या मुलांच्या अंगात रक्त कमी असल्याने अशक्तपणा आहे.या मुलांची दर तासाला तपासणी होत असल्याचे डॉ. रामानंद म्हणाले.
दरम्यान, शित्तूर तर्फ मलकापूरातील संस्थेत सोमवारी (दि. ७) सीपीआरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अशोक रणदिवे, डॉ. बाबा थोरात व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के. कांबळे यांनी ३२ मुलांची आरोग्य तपासणी केली. त्यातील बहुतांश मुलांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याचे आढळले. काही मुलांना त्वचारोग झाल्याचेही लक्षात आले. ३२ मुला-मुलींमधील पाच मुलांना अॅनेमिया झाल्याने व त्यांना थोड्या प्रमाणात झटकेही येत असल्याने पुढील उपचारास सीपीआरमध्ये पाठविले. रविवारी दिवसभर तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, समाजकल्याण अधिकारी यांनी संस्थेला भेटी दिल्या. मुलांना अंघोळ, नवीन कपडे तसेच पुरेसे अन्न मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते. त्यांच्या निवासी खोल्यांची व परिसराची स्वच्छता केली. सोमवारी, शाहूवाडी, पन्हाळा विभागाचे प्रांताधिकारी सुचित्रा शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे.
फातिमाच्या प्रकृ तीत सुधारणा
दिवाळी दिवशी फटाके उडविताना छातीला भाजून गंभीर जखमी झालेल्या छोटी फातिमा (८) हिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार करून सोमवारी सीपीआरमध्ये दाखल केले. तिच्या रुग्णालयाचा १३ हजार रुपये खर्च डॉ. प्रकाश संघवी यांनी माफ केला, तर बाहेरील औषधांचा १७ हजार रुपये खर्च जिल्हा बैतुलमाल कमिटी व मज्जीद यांनी वर्गणी काढून भरला. यापुढचाही खर्च मज्जीदीकडून करणार असल्याचे बंकट थोडगे यांनी सांगितले.
फळांवर
तुटून पडली
या मुलांना सोमवारी नगरसेवक सत्यजित कदम, ईश्वर परमाळ, विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, विजय खाडे यांनी फळे वाटताच सर्व मुले फळांवर तुटून पडली.