अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांचा विचारच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:10 AM2021-02-05T07:10:55+5:302021-02-05T07:10:55+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले. सर्वसामान्यांसह विविध घटकांची आर्थिक स्थिती बिघडली. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या घटकांना ...
कोल्हापूर : कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले. सर्वसामान्यांसह विविध घटकांची आर्थिक स्थिती बिघडली. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या घटकांना मदत होण्याची अपेक्षा होती. मात्र, त्याचा विचार केंद्र सरकारने केलेला नाही. अर्थसंकल्प गतिमान नसून अपेक्षाभंग करणारा आहे, अशा प्रतिक्रिया सोमवारी अर्थक्षेत्रातील तज्ज्ञ, व्यापारी, व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने शिवाजीराव देसाई सभागृहात केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत चर्चासत्र घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प हा आगळावेगळा असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी लोकांसह सरकारचा खर्च वाढविण्याच्या दृष्टीने तरतुदी करण्याची गरज होती; पण त्याबाबत काहीच झालेले नाही. शेतीक्षेत्रासाठी ठोस काही नसल्याचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील काही संस्थांच्या खाजगीकरणाचा निर्णय धोरणात्मक चौकटीत राहून घेतला आहे. अर्थसंकल्प गतिमान नाही. संकल्प करून ‘अर्थ’ मांडला असल्याचे अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. विजय ककडे यांनी सांगितले. करांच्या दरामध्ये बदल केलेला नाही. स्टार्टअप, उद्योगांना पूरक ठरणारे, तर करचुकवेगिरी करणाऱ्यांना वॉर्निंग देणारे बजेट असल्याची प्रतिक्रिया सीए असोसिएशन कोल्हापूरचे खजानिस चेतन ओसवाल यांनी व्यक्त केली. आनंद माने, शांताराम सुर्वे, नरेंद्र माटे, प्रदीपभाई कापडिया, कमलाकार बुरांडे, महेश धर्माधिकारी, आदींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धनंजय दुग्गे, प्रशांत शिंदे, अनिल धडाम, अरुण सावंत, आदी उपस्थित होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी स्वागत केले. कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रास्ताविक केले. खजानिस हरिभाई पटेल यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले.
चौकट
तर किलोमीटरचा दगड मागे घ्यावा लागेल
कच्चा तेलाचे दर कमी असताना पेट्रोल- डिझेलचे वाढणारे दर पाहता वाहनांचे अव्हरेज वाढविण्यासह किलोमीटर दर्शविणारा दगड थोडा मागे घ्यावा लागेल, अशी टीका आनंद माने यांनी केली. मुंबई- कन्याकुमारी कॉरिडॉरची मागणी फसवी असल्याचे त्यांनी सांगितले.