‘ब्रिस्क’ला मुदतवाढ देण्याचा प्रश्नच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:49+5:302021-03-31T04:25:49+5:30
गडहिंग्लज : ब्रिस्क कंपनीने कारखाना सोडणार असल्याचे पत्र शासनाला दिले आहे, कारखान्याला दिलेले नाही. कंपनीबरोबर झालेल्या कराराची मुदत अजून ...
गडहिंग्लज :
ब्रिस्क कंपनीने कारखाना सोडणार असल्याचे पत्र शासनाला दिले आहे, कारखान्याला दिलेले नाही. कंपनीबरोबर झालेल्या कराराची मुदत अजून दोन वर्षे शिल्लक आहे. त्यामुळे कंपनीला मुदतवाढ देण्याचा प्रश्नच नाही; परंतु कंपनी जर कारखाना सोडणारच असेल तर पुढील नियोजन संचालक मंडळ करेल, अशी माहिती अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी आज (मंगळवारी) दिली.
येथील स्वयंवर सांस्कृतिक भवनात झालेल्या कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सुभाष पाटील (कडगाव) यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सेवानिवृत्त कामगारांच्या देणीसंदर्भात औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाचा निकाल कारखाना व कंपनी दोघांनाही बंधनकारक राहील, असे उत्तर त्यांनी चंद्रकांत बंदीच्या प्रश्नाला दिले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
२०१३-१४ पासून कारखाना सहयोग तत्त्वावर ‘ब्रिस्क’ला चालवायला दिला आहे. त्यामुळे मशिनरी, डिस्टिलरी, कामगार कॉलनी इत्यादींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची जबाबदारीदेखील कंपनीचीच आहे, असे त्यांनी शिवाजी खोत यांच्या प्रश्नावरील उत्तरात स्पष्ट केले.
संचालक दीपक जाधव यांनी स्वागत केले. कारखान्याचे वित्त व्यवस्थापक बापूसाहेब रेडेकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. संचालक सतीश पाटील यांनी आभार मानले.
--------------------------------------
*
टनाला २१.८३ जादा दर
२०२०-२१ गळीत हंगामात ब्रिस्क कंपनीने ३ लाख ३९ हजार मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ६ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. उसाला प्रति टन २८०० प्रमाणे म्हणजेच प्रति टन २१ रुपये ८३ पैसे इतका जादा दर दिला आहे, असेही अध्यक्ष शिंदेंनी सांगितले.
--------------------------------------
* फोटो ओळी : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक बाळासाहेब मोरे, प्रकाश पताडे, अमर चव्हाण, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक, अनंत कुलकर्णी, क्रांतीदेवी कुराडे, जयश्री पाटील, सचिव मनोहर मगदूम उपस्थित होते.
क्रमांक : ३००३२०१९-गड-०४