जिल्ह्यातील १४१ कोरोना मृत्यूंची पोर्टलवर नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:07+5:302021-05-20T04:27:07+5:30

कोल्हापूर : शासनाच्या कोविड १९ वेबपोर्टलवरील कोरोनाने मृत्यू झालेल्या संख्येत १४१ मृतांची नोंद झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ...

There is no record of 141 corona deaths in the district on the portal | जिल्ह्यातील १४१ कोरोना मृत्यूंची पोर्टलवर नोंद नाही

जिल्ह्यातील १४१ कोरोना मृत्यूंची पोर्टलवर नोंद नाही

Next

कोल्हापूर : शासनाच्या कोविड १९ वेबपोर्टलवरील कोरोनाने मृत्यू झालेल्या संख्येत १४१ मृतांची नोंद झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी जिल्ह्याधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याने गेल्या पाच-सहा दिवसांत विशेष मोहीम राबवून सर्व खासगी रुग्णालये व कोविड केंद्रांना जिल्हा परिषदेने ही माहिती भरायला लावल्याने पोर्टलवरील आकडेवारी व प्रत्यक्ष मृत्यू यातील तफावत कमी झाली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना मृत्यूचे कागदोपत्री आकडे वेगळे आणि प्रत्यक्षात पोर्टलवर आकडे वेगळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोर्टलवर रोज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण, सध्या उपचार घेत असलेले रुग्ण, मृत्यू झालेले व बरे होऊन डिस्चार्ज झालेले रुग्ण अशी माहिती भरली जाते. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील कोरोनाची स्थिती शासनाला एका क्लिकवर कळते. हीच माहिती पुढे केंद्राकडे जाते. मात्र, ग्रामीण भागात पोर्टलवर उशिरा नोंद केली जात असल्याने मृत्यूचे आकडे केंद्रापासून लपून राहत आहेत.

जिल्ह्यातील शासकीय, खासगी रुग्णालये, कोविड रुग्णालये, समर्पित कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटरनी रोज आपल्याकडील रुग्णांची नोंद पोर्टलवर करायची आहे. यासह प्रयोगशाळांकडील चाचण्यांचीदेखील त्यावर नोंद होत असते, अनेकदा संबंधित यंत्रणेकडून पोर्टलवर नोंदणीच केली जात नसल्याने प्रत्यक्षात कोरोनाने मृत्यू झालेले व पोर्टलवरील नोंदणी या आकडेवारीत मोठी तफावत असते.

आकड्यातील तफावत..

जिल्ह्यातील एकूण कोरोनामृत्यू (बुधवारपर्यंत) : ३१८८

पोर्टलवरील नोंद -३०४७

-

जिल्हा परिषदेची वॉररूम

ही नोंदणी करण्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र वॉररूम तयार करण्यात आली आहे. जिल्हा सर्वेक्षण अधिकारी उषादेवी कुंभार यांच्यासह साथरोग तज्ज्ञ संतोष तावशी, डेटा ऑपरेटर, यासह अन्य तीन कर्मचारी या वॉररूममध्ये कार्यरत आहेत. एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली की त्यांचा पत्ता, संपर्कात आलेले व्यक्ती, हायरिस्कमधले व्यक्ती, त्यातही रुग्ण जिल्ह्यांतील असेल तर अधिकच विलंब अशा अनेक कारणांमुळे पोर्टलवरील नोंदणीला उशीर होतो.

...तर फटका बसू शकतो

पोर्टलवर कमी मृत्यूची नोंद झाल्यास आकडेवारीनुसार केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये मोठा फरक पडू शकतो. केंद्र सरकारकडून पोर्टलवरील कोरोना आकडेवारीच ग्राह्य धरली जाते. त्याच प्रमाणात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन यासह सर्व औषधांचा साठा पाठवला जातो. प्रत्यक्षात रुग्णसंख्या जास्त असल्याने त्याप्रमाणात वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवतो व स्थानिक आरोग्य यंत्रणेवर ताण येतो.

--

सर्वाधिक बळी शहरात

जिल्ह्यात सर्वाधिक बळी करवीर व हातकणंगले तालुक्यांमध्ये झाले आहेत. करवीर तालुका कोल्हापूर शहराशी तर हातकणंगले-इचलकरंजीशी जोडलेला असल्याने दोन तालुक्यांमधील मृतांची आकडेवारी जास्त दिसते.

--

सर्व रुग्णालयांनी, प्रयोगशाळांनी तसेच कोविड केंद्रांनी आपल्याकडील माहिती पोर्टलवर अपडेट ठेवणे गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तांत्रिक कारणांमुळे, व्यक्ती अन्य जिल्ह्यांतील असेल किंवा यंत्रणेवर ताण असेल तर पोर्टलवर माहिती भरली जात नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्यावतीने विशेष मोहीम हाती घेऊन पोर्टलवरील नोंदणी आता अपडेट केली आहे.

डॉ. उषादेवी कुंभार (जिल्हा सर्वेक्षण अधिकारी)

--

Web Title: There is no record of 141 corona deaths in the district on the portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.