औद्योगिक सुरक्षेबाबत ‘शॉर्टकट’ नकोच

By Admin | Published: March 4, 2015 09:19 PM2015-03-04T21:19:54+5:302015-03-04T23:41:19+5:30

कामगार, उद्योजकांनी दक्ष राहावे : हेमंत धेंड

There is no shortcut about industrial security | औद्योगिक सुरक्षेबाबत ‘शॉर्टकट’ नकोच

औद्योगिक सुरक्षेबाबत ‘शॉर्टकट’ नकोच

googlenewsNext

उद्योजक आणि कामगारांना औद्योगिक सुरक्षा, त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने जागरूक ठेवण्याचे काम औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय करते. औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त सुरक्षेबाबतचे संचालनालयाचे कामकाज, उद्योजक, कामगारांची जबाबदारी, आदींबाबत संचालनालयाचे कोल्हापूर विभागीय प्रभारी सहसंचालक हेमंत धेंड यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.

प्रश्न : औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे नियोजन कसे केले आहे?
उत्तर : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना ४ मार्चला झाली. त्यामुळे ४ ते ११ मार्च हा कालावधी ‘औद्योगिक सुरक्षा सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. कामगारांना त्यांच्या सुरक्षेचे महत्त्व कळावे, या उद्देशाने प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठी कारखान्यांमधील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सुरक्षा सप्ताहात पहिल्या दिवशी विविध कारखान्यांमध्ये कामगारांना सुरक्षेची शपथ देण्यात आली. त्यानंतर आठवडाभर प्रशिक्षण, घोषवाक्य, पोस्टर स्पर्धा, चर्चासत्रे घेण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने कारखान्यांना संचालनालयाद्वारे कळविले आहे. या उपक्रमांना कामगार, कारखानदारांकडून प्रतिसाद वाढत आहे.
प्रश्न : कामगारांनी काय दक्षता घ्यावी?
उत्तर : प्रत्येक कारखाना, उद्योगाची कामाची एक सुरक्षा पद्धत ठरलेली असते. त्या पद्धतीने कामगारांनी काम करणे आवश्यक असते. उद्योजक, कामगार यांनी याबाबत ‘शॉर्टकट’ टाळला पाहिजे. तसे झाले नाही, तर अपघात हे निश्चितपणे होतात. कामगारांनी कामातील धोके समजून घ्यावेत; शिवाय ते टाळून काम करावे. काम करताना होणाऱ्या छोट्या अपघातांकडे कामगारांनी दुर्लक्ष करू नये. त्याची माहिती त्यांनी कारखान्यांतील सुरक्षा समिती, व्यवस्थापन किंवा मालकांना कळविली पाहिजे. सुरक्षित पद्धतीचे तंतोतंत पालन केल्यास अपघात होणार नाहीत. त्यामुळे कामगार, कारखान्यांचे नुकसान होणार नाही. सुरक्षेबाबत कामगारांनी दक्षता घेतली पाहिजे.
प्रश्न : कारखानदार, उद्योजकांनी काय करावे?
उत्तर : कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात अधिकतर फौंड्री, टेक्स्टाईल उद्योग आहेत. त्यातील अधिकतर कामगारवर्ग अशिक्षित आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक आहे. या कामगारांनी सुरक्षितपणे काम करावे, यासाठी त्यांना कारखानदार, उद्योजकांनी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. काही उद्योगांनी ‘अ‍ॅटोमेशन’ केले आहे. यातील यंत्रसामग्रीला गार्डिंग, इंटर लॉकिंग अद्ययावत असल्याने सुरक्षेचा याठिकाणी फारसा प्रश्न उद्भवत नाही. मात्र, ज्या उद्योगांमध्ये अजूनही जुन्या यंत्रसामग्रीचा वापर होत आहे तेथे याबाबतची दक्षता घ्यावी. कारखान्यामध्ये घडलेला अपघात छोटा असला तरी त्याच्याकडे सुरक्षा समिती, व्यवस्थापन आणि मालकांनी गांभीर्याने पाहावे. संबंधित अपघात कसा घडला, त्याची कारणे समजून घ्यावीत. शिवाय उद्योजकांनी जागरूक राहून आपला उद्योग, कंपनीचे ‘सेफ्टी आॅडिट’ करून घ्यावे. ते कामगारांसह कारखान्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
प्रश्न : सुरक्षेबाबत संचालनालय काय करते?
उत्तर : संचालनालयाच्या कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये असलेल्या कारखान्यांना ‘सेफ्टी आॅडिट’ करण्याबाबत संचालनालयातर्फे सूचित, प्रोत्साहित केले जाते. विभागातील उद्योग आणि कामगारांची नोंदणीदेखील करून घेतली जाते. कामगारांचे आरोग्य व सुरक्षेसाठी विविध चर्चासत्रे, सुरक्षितता प्रचार आणि प्रसार कार्यक्रम, विशेष परिसंवाद, प्रशिक्षण वर्ग व निरीक्षण या माध्यमातून प्रबोधन करण्यात येते. एखाद्या कारखान्यात अपघात झाल्यास त्याची कारणे लक्षात घेऊन सुरक्षेच्यादृष्टीने सूचना केल्या जातात. शिवाय अशा स्वरूपातील अन्य कारखान्यांना या अपघाताची माहिती देऊन त्याठिकाणी असा अपघात घडू नये, यासाठी जागरूक केले जाते. त्याची परिपत्रकाद्वारे देखील माहिती दिली जाते. केवळ औद्योगिक सप्ताहापुरतेच नव्हे, तर वर्षभर विविध औद्योगिक संघटना आणि मोठ्या कारखानदारांच्या सहकार्यातून प्रबोधन शिबिरे घेतली जातात.
- संतोष मिठारी

Web Title: There is no shortcut about industrial security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.