उद्योगांसाठी विशेष पॅकेज नाही
By admin | Published: March 1, 2016 12:35 AM2016-03-01T00:35:17+5:302016-03-01T00:35:32+5:30
केंद्रीय अर्थसंकल्प : व्याजदर, करात सवलतींची उद्योजकांची अपेक्षा ठरली फोल
शिरोली : अर्थसंकल्पात उद्योगांना फारसे विशेष कोणतेही पॅकेज अथवा करात कोणतीही सूट दिलेली नाही. उद्योगांना समाधानकारक अर्थसंकल्प नाहीे; पण शेती, मूलभूत सुविधा, रस्ते, जलसंवर्धन यांना पॅकेज जाहीर केल्याने पुढील काळात उद्योग सुधारतील, असे उद्योजकांना वाटते.
गेल्या दोन वर्षांपासून उद्योगांना मोठी मंदी आली आहे. या मंदीमधून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली हे उद्योगांना व्याज दरात, टॅक्सेसमध्ये सवलती देतील, अशी अपेक्षा उद्योजकांना होती, पण तसे काहीच झाले नाही, लघु आणि मध्यम उद्योगांना करात काही प्रमाणात सवलत देण्यात येणार आहे. देशात नवीन उद्योग यावेत, उद्योग वाढावा, लोकांना काम मिळावे म्हणून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी एक दिवसात परवाना मिळणार आहे. नूतनीकरण तत्काळ मिळणार आहे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कुशल मनुष्यबळ लागते, हे मनुष्यबळ देण्याचे काम शासन करणार आहे, तसेच तीन वर्षे कामगारांचा फंड शासनाने भरण्याचा निर्णय घेतला आहे.
पाच कोटीपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना करात सवलत देण्यात आली आहे. हा थोडासा लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा आहे, पण दुसरीकडे वाहन खरेदीवर टॅक्स वाढविला आहे. डिझेल वाहन खरेदीवर अडीच टक्के तर दहा लाखांच्या वरील वाहन खरेदीवर एक टक्का आणि आलिशान चारचाकी वाहनावर चार टक्के सेवा कर वाढविला आहे. त्यामुळे वाहन खरेदीला ब्रेक लागू शकतो , त्यामुळे मंदी वाढू शकते, एक एप्रिलपासून जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) लागू करण्यात येणार होता, पण तो पुन्हा एक वर्ष लांबणीवर टाकला आहे, त्यामुळे उद्योजक निराश झाले आहेत, तर जागतिक पातळीवर मंदी असल्याने निर्यात कमी झाली आहे, असे अर्थमंत्री जेटली यांनी मान्य केले आहे.
हा अर्थसंकल्प सर्वसामान्य शेतकरी वर्गासाठी चांगला आहे. अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. रस्ते प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे पुढच्या काळात उद्योगांना कामे वाढण्यासाठी ही योजना राबविली आहे, असे वाटते, असे उद्योजकांनी सांगितले आहे. (वार्ताहर)
उद्योगांना स्वतंत्र असे काही दिलेले नाही, पण लघु आणि मध्यम उद्योगांना करात सवलत दिली आहे. नवीन उद्योगांना सवलती देणार आहेत, पण कोणत्या सवलती मिळणार हे जाहीर केलेले नाही. शेतकरी वर्गाला पॅकेज जाहीर केले आहे. बँकांना पॅकेज दिले आहे. सेवाकर एक ते अडीच टक्क्यांनी वाढविला आहे.
-रामप्रताप झंवर, ज्येष्ठ उद्योजक
लोकांकडे पैसे आले पाहिजेत, वाहन खरेदी वाढली पाहिजे, यासाठीच शेती, रस्ते प्रकल्पासाठी, पायाभूत सुविधा यांना या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्राधान्य दिले आहे. लोकांकडे पैसे आले की आपोआपच उद्योग वाढीस लागेल, ही संकल्पना शासनाने ठेवली आहे.
- व्ही. एन. देशपांडे, तज्ज्ञ उद्योजक