‘बीएलओं’ला निवडणूक विभागाकडील फॉर्म आणायला वेळ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:22 AM2018-10-29T00:22:39+5:302018-10-29T00:22:52+5:30
प्रवीण देसाई । कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीची मोहीम गतीने सुरु आहे; परंतु आळसावलेल्या ‘बीएलओं’मुळे नागरिकांना मनस्ताप ...
प्रवीण देसाई ।
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीची मोहीम गतीने सुरु आहे; परंतु आळसावलेल्या ‘बीएलओं’मुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवडणूक विभागाकडे मतदार नोंदणीचे फॉर्म उपलब्ध असूनही ते आणण्यास त्यांना वेळ नाही. उलट ‘तुम्हीच झेरॉक्स काढा,’ असे नागरिकांना सांगून त्यांना भुर्दंड घालण्याचे प्रकार होत आहेत.
निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये नावनोंदणी, नावातील दुरुस्ती, मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करणे, आदी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारीच्या (बीएलओ) माध्यमातून करायची आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने हे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे; परंतु काही ‘बीएलओ’ मात्र जिल्हा प्रशासनालाही जुमानायला तयार नाहीत. रविवारी सुट्टीदिवशी विशेष मोहीम घेण्यात येत आहे. हा रविवार शेवटचा असल्याने बहुतांश मतदान केंद्रांवर नोंदणीसाठी गर्दी होती. नावनोंदणी, स्थलांतरण, नावात दुरुस्ती यांसाठी निवडणूक विभागाकडून सर्वच ‘बीएलओं’ना फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत; परंतु काही आळसावलेल्या ‘बीएलओं’नी कळसच केला आहे. ते निवडणूक विभागाकडे फॉर्मच आणायला फिरकलेले नाहीत. त्यांनी आपल्याच पातळीवर ‘फॉर्मची झेरॉक्स काढा आणि नावनोंदणी करा,’ असा फॉर्म्युला राबविला आहे. दौलतनगर शेजारील एका शाळेत, तसेच राजेंद्रनगर येथील एका मतदान केंद्रातील हा प्रकार रविवारी समोर आला. नावनोंदणी व स्थलांतरासंदर्भातील फॉर्म मागण्यासाठी गेलेल्या नागरिकाला ‘तुम्हीच झेरॉक्स काढून आणा,’ असा सल्ला ‘बीएलओं’नी दिला. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश ठिकाणची झेरॉक्स सेंटर बंद असल्याने नागरिकांची दिवसभर फरफट झाली. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
निवडणूक विभागाकडे चौकशी केली असता पुरेशा प्रमाणात फॉर्म उपलब्ध आहेत. जर फॉर्म संपले असतील तर संबंधित ‘बीएलओ’ने ते येऊन नेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. नागरिकांना परस्पर झेरॉक्स काढायला लावणे हे चुकीचे असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.