लस संपल्याने आज लसीकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:53+5:302021-04-24T04:25:53+5:30
कोल्हापूर : लस शिल्लक नसल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात लसीकरण होणार नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दुसऱ्या डोससाठीचे कोव्हॅक्सिनचे ...
कोल्हापूर : लस शिल्लक नसल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात लसीकरण होणार नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दुसऱ्या डोससाठीचे कोव्हॅक्सिनचे केवळ ५ हजार डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे तेवढ्यापुरतेच लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी दिवसभरामध्ये जिल्ह्यात ११ हजार ८०३ नागरिकांना लस देण्यात आली. यामध्ये ७ हजार ४५२ जणांनी पहिला तर ४ हजार ३५१ जणांनी दसरा डोस घेतला आहे. तीन दिवसांपूर्वी आलेले ७० हजार डोस संपल्याने शुक्रवारी केवळ १६१ केंद्रांवरच लसी देण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी लस संपल्याचेच फलक पाहावयास मिळाले. रात्री ११ वाजेपर्यंत पुण्याहून लस नेण्यासाठी कोणताही निरोप आरोग्य विभागाकडे आलेला नव्हता. रात्रीतून तसा निरोप आला तरी पुण्याहून ही लस आणणे आणि ती शहरासह जिल्ह्याला वितरित करणे ही कामे दुपारपर्यंत हाेणार नसल्याने नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी करू नये.
लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वितरण जिल्ह्यात केले जाईल. रविवारपासून पुन्हा लसीकरण सुरळीत होईल, असा विश्वास समन्वय अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी व्यक्त केला.