जमिनी घेतल्या पण पाण्याचा थेंबही नाही
By admin | Published: December 15, 2015 10:55 PM2015-12-15T22:55:50+5:302015-12-15T23:39:11+5:30
उपसाबंदीने स्थिती : चित्री प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा
आजरा : चित्री प्रकल्पाने बाधीत शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या परंतु उपसाबंदी व खंडित केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे चित्रीतील पाणी केवळ पहात बसण्याची वेळ चित्री लाभक्षेत्रातील आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. गडहिंग्लजऐवजी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘चित्री’चे पाणी सोडताना विचार केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.मान्यता असताना परोली येथे एकच बंधारा बांधण्यात आला आहे. परोली बंधारा ते चांदेवाडी बंधारा यामध्ये कमीत कमी ५ कि. मी. अंतर असून येथे कोठे डोह अथवा बंधारा नाही. त्यामुळे चित्री धरणातून पाण्याचा प्रवाह अखंड असेल तरच शेतकरी पिकांना पाणी देऊ शकतो. पाटबंधारे खात्याने चांदेवाडीपर्यंत पाणी परवाना दिलेल्या क्षेत्राचा विचार करून लागणारे पाणी प्रवाही ठेवले, तरच शेतकरी पिके घेऊ शकणार आहेत. प्रकल्पात जमिनी गेल्या पण प्रकल्पाचा पाणीसाठा शिल्लक जमिनीला पाणी देऊ शकत नाही, अशी अवस्था आहे. प्रशासनाने चांदेवाडी बंधाऱ्याच्या बॅक वॉटरपर्यंत पाणी परवाना दिलेल्या क्षेत्रापर्यंत पाण्याचा प्रवाह सतत चालू ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चित्री प्रकल्पाने बुडीत क्षेत्रासाठी पुनर्वसनासाठी आजरा तालुक्यातील जमिनी गेल्या असून, आजरा तालुक्यातील शेतकरी, भूमीहिन, अल्पभूधारक झाले आहेत. तेव्हा आजरा तालुक्यातील लागणाऱ्या पाण्याचा प्रथम विचार करावा. गडहिंग्लज तालुक्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा विचार करून पाटबंधारे विभाग नियोजन करत असेल व यामुळे शेतकऱ्यांकडून काही वाईट गोष्टी घडल्यास त्याला संपूर्णपणे पाटबंधारे विभाग जबाबदार राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनावर अॅड. सचिन इंजल, विजय सरनोबत, अनंत मायदेव, परेश पोतदार, केरबा पारपोलकर, विष्णू मांजरेकर, सखाराम सावंत, आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
लाईट नाही.. पाणी आहे..
चित्रीमध्ये पाणी सोडण्याची वेळ आणि वीजपुरवठा खंंिडत करण्याची वेळ एकच असल्याने चित्रीचे पाणी सोडले तरीही वीजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना पाणी उचलता येत नसल्याने ‘पाटबंधारे’ने शेतकऱ्यांची थट्टा चालविल्याचा आरोप विनय सबनीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.