..तर उजाड जयप्रभा 'कात' टाकेल, राजाराम महाराज, भालजींच्या स्मारकाच्या मागणीस जोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:57 AM2022-02-15T11:57:20+5:302022-02-15T12:05:31+5:30

जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे वृत्त समोर येताच चित्रपटसृष्टीत असंतोष पसरला आहे

There should be a memorial of Rajaram Maharaj and Bhalji Pendharkar in the place of Jayaprabha Studio | ..तर उजाड जयप्रभा 'कात' टाकेल, राजाराम महाराज, भालजींच्या स्मारकाच्या मागणीस जोर

..तर उजाड जयप्रभा 'कात' टाकेल, राजाराम महाराज, भालजींच्या स्मारकाच्या मागणीस जोर

Next

इंदुमती गणेश

कोल्हापूर : छत्रपती राजाराम महाराज यांनी जयप्रभा स्टुडिओची जागा ही चित्रीकरणासाठी दिली होती, भालजींनी त्यांचा शब्द पाळला, पण लता मंगेशकर यांनी तो जपला नाही. त्यामुळे या वास्तूत लता मंगेशकर यांचे नव्हे तर राजाराम महाराज आणि भालजी पेंढारकर यांचे स्मारक व्हायला हवे, अशी मागणी कलाकारांकडून होत असून, त्यावर समाजमाध्यमावर मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सध्या वापर नसल्याने व झाडी वाढल्याने अवकळा आली असली वास्तू आजही सुस्थितीत आहे. त्यांचे नूतनीकरण व स्वच्छता केली की ती पुन्हा मूळ रूपात येऊन चित्रीकरणाला सुरुवात होऊ शकते.

कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा वारसा लाभलेला जयप्रभा स्टुडिओ लता मंगेशकर यांनी दाेन वर्षांपूर्वी विकल्याने व तो कोल्हापुरातीलच बांधकाम व्यावसायिकांनी विकत घेतल्याने चित्रपटसृष्टीत असंतोष पसरला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक कोल्हापुरात व्हावे यावरून या विषयाला वाचा फुटली, पण त्यांनी स्टुडिओ चालावा यासाठी नंतरच्या काळात काहीच प्रयत्न केले नाही.

उलट टप्प्याटप्प्याने त्यांची कोट्यवधींना विक्री केली. त्याचा राग कोल्हापूरकरांच्या मनात आहे. दुसरीकडे ज्यांनी कोल्हापुरात चित्रपटसृष्टी बहरावी म्हणून एवढी मोठी १३ एकर जागा दिली, त्या छत्रपती राजाराम महाराज यांची तसेच या स्टुडिओला आणि चित्रपटसृष्टीला आपले आयुष्य अर्पण केलेल्या भालजी पेंढारकर यांच्या कोणत्याही पाऊलखुणा येथे नाहीत.

उद्या या वास्तूचा इतिहास सांगितला जाईल तेव्हा त्यांच्या कार्याची माहिती देणारे स्मारक येथे असायला हवे. हे दोन व्यक्ती खऱ्या अर्थाने जयप्रभाचे शिलेदार होते, त्यामुळे त्यांच्याच स्मारकासाठी आग्रह धरला जात असून त्यासाठी कलाकारांनी समाजमाध्यमावर मोहीम सुरू केली आहे.

हे आहे वास्तूचे वैभव...

कित्येक वर्षे बंद अवस्थेत असल्याने परिसरात मोठी झाडी वाढली आहेत. येथे चित्रीकरणाचे सेट लावता येतील असे दोन स्टुडिओ आहेत. जे आजही सुस्थितीत आहेत. शिवाय कलाकारांना तयार होण्यासाठी मेकअप रूम, चित्रीकरण झाल्यावर पुढील तांत्रिक प्रक्रिया करण्यासाठी प्रयोगशाळा, कलाकारांना राहण्यासाठी रुम, मोठ्ठे वडाचे झाड.

भालजी राहत होते ती दुमजली इमारत, मधला चौक, लता मंगेशकर राहायच्या ती खोली, वाहने लावण्यासाठीचे शेड या सगळ्या दगडविटांचे बांधकाम आजही व्यवस्थित आहे. काही ठिकाणी पडझड झाली आहे. पण नूतनीकरण केले की सगळ्या वास्तू वापरता येण्यासारख्या आहेत.

शासनावर बोजा का?

ही वास्तू विकत घेणाऱ्यांना जयप्रभाचा आणि त्यासाठीच्या लढ्याचा इतिहास माहिती असतानाही त्यांनी हा व्यवहार केला. खरेदीपत्रात त्याचा उद्देश नाट्य, संगीत, कला या कारणासाठी वापर असा उल्लेख केला आहे. तरीदेखील ही वास्तू शासनाने विकत घ्यावी किंवा पर्यायी जागा द्यावी, अशी आता त्यांच्याकडून मागणी का केली जात आहे. खरेदीदारांनीच वास्तूचे नूतनीकरण करावे, स्मारक करावे आणि चित्रपट व्यावसायिकांना चित्रीकरणासाठी स्टुडिओ उपलब्ध करून द्यावा. असे केले तर त्यांनाही उत्पन्न मिळत राहील.

चित्रीकरणात वापरला जाणारा स्टुडिओ

लता मंगेशकर राहायच्या ती खोली
इमारतींच्या मध्यभागी असलेला चित्रीकरणाचा चौक

परिसरातील मारुतीचे मंदिर

Web Title: There should be a memorial of Rajaram Maharaj and Bhalji Pendharkar in the place of Jayaprabha Studio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.