कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवईंचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 07:15 PM2022-01-08T19:15:34+5:302022-01-08T19:27:58+5:30
कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.
कोल्हापूर-ओरोस : ज्या प्रमाणे जिल्हा न्यायालयांची निर्मिती झाली त्या प्रमाणात खंडपीठाची स्थापना होणे आवश्यक आहे. कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे अशी निसंदिग्ध ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई यांनी आज, शनिवारी दिली.
खंडपीठ कृती समितीतर्फे त्यांना कोल्हापूर येथे सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ व्हावे याबाबतचे निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, तसेच सिंधुदुर्गनगरी ओरस (जि.सिंधुदूर्ग) येथे शनिवारी वकिलांची एक दिवसीय कार्यशाळा झाली. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गवई यांनी कोल्हापूरच्या खंडपीठ मागणीचे स्वत:हून जोरदार समर्थन केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश सुरेंद्र तावडे, न्यायाधिश प्रकाश नाईक हे देखील उपस्थित होते.
कृती समितीतर्फे अध्यक्ष ॲड.गिरीश खडके यांच्या हस्ते न्यायाधीश गवई यांचा करवीर निवासिनी महालक्ष्मीची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पदाधिकारी उपस्थित होते.
शिष्टमंडळात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड विवेक घाटगे, उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, कृती समितीचे उपाध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण, सचिव अॅड विजयकुमार ताटे, सहसचिव ॲड संदीप चौगले, ॲड रविंद्र जानकर तसेच वकीलवर्ग उपस्थित होते