आरोग्य साहित्यखरेदीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:17 PM2020-09-16T19:17:30+5:302020-09-16T19:20:17+5:30
कोरोनाच्या गंभीर स्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र कोरोना साहित्यखरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. त्याची जिल्हा परिषदेच्या बाहेरील उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बुधवारी केली.
कोल्हापूर : कोरोनाच्या गंभीर स्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र कोरोना साहित्यखरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. त्याची जिल्हा परिषदेच्या बाहेरील उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बुधवारी केली.
या भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे समजते; पण ज्यांनी भ्रष्टाचार केला, तेच चौकशी करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेबाहेरील समितीला चौकशी व अहवाल सादर करण्यासाठी ठरावीक कालावधी देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा परिषदेने व्हीटीएम किट्स, पीपीई किट्स, एन ९५ मास्क, थर्मल स्कॅनर यांसह अनेक सुमारे २८ वस्तूंची खरेदी केली. या खरेदीचे दर आणि वस्तूंची संख्या यांवर नजर टाकली तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.
या खरेदीसाठी वस्तूंचे उत्पादन मूल्य, बाजारभाव, उपलब्ध दरकरार, पुरवठादार कंपन्या यांचा अभ्यास जिल्हा परिषदेकडून झाला होता की नाही, हाच मुळात एक मोठा प्रश्न आहे. बाजारात ४० रुपयांना मिळणारा मास्क जिल्हा परिषदेला २५० रुपयांना देण्यात आला, असा अजब कारभार झाला आहे. पुरवठादाराच्या फायद्यासाठी हे केले जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी.
७०० बेड वाढविणार
विभागीय आयुक्त राव व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील पाच रुग्णालयांमध्ये ७०० बेड वाढविण्यात येत असल्याचे सांगितले. पुढील १०-१२ दिवसांत ते कार्यान्वित होतील. सध्याच्या या गंभीर स्थितीत प्रशासनाला अनेक पातळ्यांवर लढावे लागत आहे. त्यात मानवी प्रवृत्तीला तोंड देणे जास्त कठीण आहे. या सगळ्यांत खूप वेळ आणि ऊर्जा खर्च होत असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.