रांगणा गडावर जाण्यासाठी रस्ता व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:16 AM2021-06-19T04:16:11+5:302021-06-19T04:16:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : भुदरगड तालुक्यातील रांगणा गडावर जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही. त्यामुळे गडावर जाण्यासाठी इतिहासप्रेमी व ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील रांगणा गडावर जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही. त्यामुळे गडावर जाण्यासाठी इतिहासप्रेमी व गडप्रेमींची अडचण होत आहे. या गडावर जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता व्हावा, रस्ता झाल्यास पर्यटनात वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल अशी मागणी रांगणा संवर्धन समिती व चिक्केवाडी ग्रामस्थांनी भुदरगड तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन म्हटले आहे की,
किल्ले रांगणा, चिक्केवाडी ते भटवाडी हे अंतर ९ कि.मी आहे. सध्या या ठिकाणी ५ वर्षांपूर्वी वीज पोहोचली आहे. पाटगाव ते रांगणा गडावर जाण्याचा मार्ग जंगलातून जातो. या मार्गावरून उन्हाळ्यात दोन चाकी, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, ट्रक जाऊ शकतो. पण या मार्गातून पावसाळ्यात जाताना मात्र मुसळधार पावसात तिथपर्यंत चालतसुद्धा जाऊ शकत नाही. मार्गावर ओढा आणि एक नाला आहे, या ओढ्यावर पूलवजा मोरी होण्याची गरज आहे. रस्ता नसल्याने पावसाळ्यापूर्वी चिक्केवाडी, भटवाडी या गावातील लोकांना पाटगाव बाजारातून जीवनावश्यक वस्तूंची तरतूद करावी लागते. त्यामुळे या भागातील गावासाठी व रांगणा गडावर जाण्यासाठी रस्ता व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना चिक्केवाडी ग्रामस्थ, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मानसिंग देसाई, बाजीराव देसाई, शशिकांत पाटील, भाऊ कोगनुळकर, अनिल जाधव, समीर मकानदार आदी उपस्थित होते.
१८ रांगणा निवेदन
फोटो ओळ
रस्ता व्हावा या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संदीप भूतल यांना देताना मानसिंग देसाई, शशिकांत पाटील, समीर मुजावर, बाजीराव देसाई आदी.