बालिंग्यातील सराफाचा ठावठिकाणा लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 AM2021-05-06T04:24:42+5:302021-05-06T04:24:42+5:30
कोपार्डे : पिग्मी, भिशी व सुवर्ण ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करून त्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार ...
कोपार्डे : पिग्मी, भिशी व सुवर्ण ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करून त्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या बालिंगा येथील सराफाचा पोलिसांना अद्यापपर्यंत ठावठिकाणा लागलेला नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात अडीच कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊनही कोणालाही अटक करण्यात आली नसल्याने गुंंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे. मूळचा दोनवडे येथील असणारा सराफ सतीश पोवाळकरने बालिंगा येथे आंबिका ज्वेलर्स या नावाने सोने चांदीचे ज्वेलरी दुकान थाटले होते. त्यातून तो पिग्मी, भिशी व्यवसायही करत होता. ज्वेलरीच्या आडून लोकांमध्ये विश्वास निर्माण करून बेकायदेशीर सुवर्ण ठेव योजना सुरू केली. त्यामध्ये करवीर तालुक्यातील अनेक गावांमधील महिलांंनी सोन्याच्या, गुंतवणूकदारांनी व्याजाच्या व बचतीच्या हव्यासापोटी गुंतवणूक केली. मात्र, काही दिवसांपूर्वी घरातील किमती वस्तू घेऊन सराफ सतीश पोवाळकर आपल्या पत्नीसह फरार झाला. आठ दिवसांनी गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी फरार सराफ सतीश पोवाळकर व त्याचा सातार्डे येथील मेहुणा अमोल पोवार यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत पोवाळकरला अटक झाली नसल्याने गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. पै-पै करून जमवलेली रक्कम बुडते की काय, अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे.
चौकट :
हतबल गुंतवणूकदारांचे भवितव्य पोलिसांच्या हातात.
कष्टाने मिळविलेले पैसे भविष्यात उपयोगी पडावे म्हणून गुंतवणूकदारांनी सराफाकडे विश्वासाने दिले. पण तो फसवणूक करून फरार झाला. आता सराफाविरोधात कायदा हातात घेऊन काही करता येत नाही. पोलिसांनी फरार सराफाला शोधून काढले तर गुंतवणूकदारांचे थोडे फार पैसे तरी मिळतील ही आशा आहे.
तपास चालू आहे
गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी सराफ पोवाळकर याच्या कणेरकरनगरमधील घराचा व बालिंगा येथील आंबिका ज्वेलर्स या दुकानाचा इनकॅमेरा पंचनामा केला आहे. पण यातून पोलिसांना काही हाती लागलेले नाही. यामुळेच या फसवणूक प्रकरणी कोणतेही वक्तव्य न करता फक्त तपास चालू असल्याचे करवीर पोलीस ठाण्यातून सांगण्यात येत आहे.