शहरामध्ये राजकीय टोलेबाजी रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:38 AM2020-12-14T04:38:03+5:302020-12-14T04:38:03+5:30
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये राजकीय टोलेबाजी र्रगली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रत्येक ...
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये राजकीय टोलेबाजी र्रगली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
प्रत्येक पक्षातील नेत्यांनी महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहे. भाजप, ताराराणी आघाडीसोबत निवडणुकीनंतर आघाडी करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचाही यामध्ये समावेश आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपली असून कोरोनामुळे निवडणूक घेण्यास अडथळा निर्माण झाल्याने सहा महिन्यांसाठी प्रशासक नियुक्त करण्यात आले. सध्या कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील आठवड्यात प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीची प्रक्रिया गतिमान होणार आहे. असे असले तरी शहरात राजकीय टोलेबाजी रंगली आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी केवळ महापालिकेच्या निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधकांवर निशाणा साधला जात आहे. काही पक्षांतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला असून निवडणुकीपूर्वी विरोधकांना थेट पदावरून हटविण्याची मागणी होत आहे. एकूण महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.
चौकट
महापालिकेच्या निवडणुकीतील कळीचे मुद्दे
रखडलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना, घरफाळा घोटाळा, रखडलेला अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रस्ते, पाण्याचे प्रश्न, रस्ते हस्तांतरण प्रस्ताव, शालिनी सिनेटोन जागा आरक्षणाचा प्रस्ताव
चौकट
प्रत्येक पक्षाकडून ८१ जागांवर उमेदवार रिंगणात उतरण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही यामध्ये समावेश आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढविण्याबाबतच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता यामधील तीन पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. भाजप, ताराराणी आघाडीनेही व्यूहरचना आखणे सुरू केले आहे.
निवडणूक महापालिकेची, टार्गेट विधान परिषद
आगामी विधान परिषदेसाठी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे गरजेचे आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप, ताराराणी आघाडीतील नेत्यांनी आतापासूनच यासाठी धडपड सुरू केली आहे. विरोधी भाजप, ताराराणी आघाडीकडूनही महापालिकेवर सत्ता मिळवण्याबरोबरच विधान परिषदेमधील मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
बातमीदार : विनोद