यंत्रमागधारकांसह कामगारांच्या मजुरीवाढीचा प्रश्न ‘जैसे थे’, सहायक कामगार आयुक्तांकडूनही घोषणा नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 05:01 PM2023-01-30T17:01:27+5:302023-01-30T17:01:59+5:30
यंत्रमागधारकांना गेल्या दहा वर्षांपासून ट्रेडिंगधारकांनी अजिबातच मजुरीवाढ दिली नाही.
अतुल आंबी
इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांना यंत्रमागधारकांकडून मजुरीवाढ मिळेना, तर यंत्रमागधारकांना ट्रेडिंगधारकांकडून मजुरीवाढ मिळेना, असे मजुरीचे त्रांगडे निर्माण झाले आहे. त्यात दरवर्षी सहायक कामगार आयुक्तांकडून जाहीर केली जाणारी मजुरीवाढीची घोषणा यंदा जानेवारी महिना संपला तरी केली नाही.
शहरातील वस्त्रोद्योगाची साखळी सुरळीत चालण्यासाठी सर्व घटकांमध्ये मजुरीची सुसूत्रता आवश्यक आहे. परंतु यामध्ये वारंवार तफावत निर्माण होते. त्यासाठी २८ फेब्रुवारी २०१३ ला तत्कालीन कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेऊन यंत्रमागधारकांनी कामगारांना दरवर्षी १ जानेवारीपासून मजुरीवाढ द्यावी. ही मजुरीवाढ वर्षातील महागाई भत्त्याचे मजुरीवर रुपांतर करून त्याची ५२ पिकांनुसार मजुरी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून जाहीर व्हावी, असे ठरले होते. त्यानुसार सन २०१४ पासून ते २०२२ पर्यंत दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मजुरीवाढीची घोषणा केली जाते. यंदा महिना संपला तरी घोषणा झाली नाही. याबाबत शहरातील कामगार संघटनांनी निवेदन देऊन घोषणा करण्याची मागणी केली आहे.
सन २०१६ नंतर व्यवसायातील अडचणी वाढल्याने सन २०१७ पासून ते सन २०२२ पर्यंत सहायक आयुक्तांकडून घोषित केलेल्या तक्त्यानुसार यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ दिली गेली नाही. महापूर, कोरोना अशा विविध कारणांमुळे कामगारांनीही मजुरीवाढीची मागणी केली नाही. मात्र आता मजुरीवाढीची मागणी होत आहे. परंतु यंत्रमागधारकांना गेल्या दहा वर्षांपासून ट्रेडिंगधारकांनी अजिबातच मजुरीवाढ दिली नाही. परिणामी त्यांच्याकडून कामगारांना मजुरीवाढ देणे अवघड बनले आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसाठी ट्रेडिंग असोसिएशनसोबत बैठका झाल्या, पण तोडगा निघाला नाही. म्हणून दोन्ही घटकांचा मजुरीवाढीचा प्रश्न जटील बनला आहे.
यावर सहायक कामगार आयुक्त, लोकप्रतिनिधी व तिन्ही घटकांचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे मार्ग काढून या मजुरीवाढीच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढून पुन्हा सुसूत्रता आणावी, अशी मागणी होत आहे.
मजुरीची आकडेवारी
सध्या यंत्रमाग कामगारांना ५२ पिकांला एक रुपये ८ पैसे ते एक रुपये १२ पैशांपर्यंत मजुरी दिली जात आहे. सहायक कामगार आयुक्तांच्या सन २०२२ च्या तक्त्यानुसार ही मजुरी एक रुपये ३२ पैसे पाहिजे. तसेच त्यामध्ये यावर्षीची किमान १३ ते १८ पैसे वाढ होते. कारण महापालिका झाल्याने परिमंडल (झोन) २ ऐवजी १ लागू झाला आहे. त्याचबरोबर यंत्रमागधारकांना ट्रेडिंग असोसिएशनकडून पाच रुपये ५० पैसे ते सहा रुपयांपर्यंतच मजुरी मिळत आहे. त्यात गेल्या दहा वर्षांपासून वाढ झाली नाही.
अधिकाऱ्यांची टाळाटाळ
याबाबत जाणून घेण्यासाठी येथील सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याशी तीन दिवस संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. कामगार हिताचा निर्णय होत नसल्याने कामगारातून त्यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षातील मंदी, महापूर व कोरोना अशा आपत्कालीन परिस्थितीत कामगारांनी मजुरीवाढीची अपेक्षा केली नाही. परंतु वाढलेल्या महागाईमुळे कामगारांना जगणे मुश्किल बनत असल्याने तत्काळ मजुरीवाढ द्यावी. - आनंदा गुरव, अध्यक्ष-जनरल लेबर युनियन
ट्रेडिंगधारकांकडून खर्चीवाला यंत्रमागधारकांना गेल्या दहा वर्षांपासून मजुरीवाढ मिळाली नाही. त्यांच्याकडून मजुरीवाढ मिळाल्याशिवाय कामगारांना मजुरीवाढ देणे अशक्य आहे. त्यात व्यवसायाची परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून दिवसेंदिवस नाजूक बनत आहे. - विकास चौगुले, अध्यक्ष-स्वाभिमानी यंत्रमागधारक संघटना