बिंदू चौकात पाणी पेटले
By admin | Published: April 4, 2016 01:09 AM2016-04-04T01:09:18+5:302016-04-04T01:10:50+5:30
तिघे जखमी : टँकरवरून दोन गटांत हाणामारी; तलवार हल्ला
कोल्हापूर : बिंदू चौकात पाण्याच्या टँकरवरून बाराईमाम व भोई गल्ली येथील तरुणांच्या दोन गटांत झालेल्या तलवार हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. तौसिफ आरिफ मोमीन (वय २५), झाकीर सय्यद मोमीन (४५, दोघे रा. बाराईमाम), हाकिब मुसा सौदागर (२४, रा. भोई गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही बाजूंच्या तरुणांनी परिसरात प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलिसांची फौज घटनास्थळी आल्याने हल्लेखोर पसार झाले. या घटनेनंतर तणाव पसरल्याने रात्री उशिरापर्यंत या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला. दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पाणीटंचाईमुळे गेल्या दोन दिवसांपासून बिंदू चौक परिसरात महापालिकेच्या टँकरने पाणी पुरविले जात आहे. रविवारी रात्री सातच्या सुमारास गंजी गल्ली येथे पाण्याचा टँकर आला. हा टँकर झाकीर मोमीन हे स्वत:साठी घेऊन जाऊ लागले. यावेळी टँकरचा नळ सोडण्यावरून बाराईमाम व भोई गल्ली येथील तरुणांच्यात वादावादी झाली. हा वाद दोन्ही गटांच्या ज्येष्ठांनी मिटविला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास दोन्ही गटाचे शंभरापेक्षा जास्त तरुण बिंदू चौकात आले. दोन्ही गट प्रतिष्ठेला पडल्याने त्यांच्यात जोरदार वादावादी होऊन धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही गटांतील काही तरुण घरातून नंग्या तलवारी नाचवत चौकात आले. चिडीला पडलेले तरुण एकमेकांशी भिडले. यावेळी जोरदार धूमश्चक्री उडाली. दोन्ही गटांतील राडा पाहून सूज्ञ नागरिकाने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलिस तत्काळ घटनास्थळी आले. पोलिस आल्याचे पाहून दोन्ही गटांच्या तरुणांनी तेथून पलायन केले.
दरम्यान, दोन्ही गटांचे कार्यकर्ते जखमींना घेऊन लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. याठिकाणी त्यांनी परस्परविरोधी फिर्यादी देण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी जखमींना सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्याचे सांगितले. दोन्ही गटांचे जखमी सीपीआरमध्ये आले. याठिकाणी पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. सीपीआर आवारात पोलिस बंदोबस्त ठेवला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)