आली लग्नघटिका... पण समीप येऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:54+5:302021-05-11T04:25:54+5:30
कोल्हापूर : विवाह सोहळ्यांसाठी हक्काचा महिना असलेल्या मेमध्ये यंदा तब्बल १६ दिवस विवाह मुहूर्त आहेत; पण लग्न करायचं कसं ...
कोल्हापूर : विवाह सोहळ्यांसाठी हक्काचा महिना असलेल्या मेमध्ये यंदा तब्बल १६ दिवस विवाह मुहूर्त आहेत; पण लग्न करायचं कसं हा पेच आता इच्छूक वधू-वरांसमोर आहे. आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर वर-वधू संशोधन थांबले आहे. त्यात आता कडक लॉकडाऊनने ठरलेल्या सप्तपदीचीही वाट अडवली आहे. त्यामुळे आली लग्नघटिका तरी समीप येऊ नका, असं म्हणायची वेळ आली आहे.
आयुष्यात एकदाच होणारा विवाह सोहळा अगदी धूमधडाक्यात व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आता तर त्याला इव्हेंट आणि सांस्कृतिक सोहळ्याचे स्वरूप आल्याने त्यात केला जाणारा डामडौल, थाटमाट, सजावट, वधू-वरांची एंट्री, जेवणावळी सगळंच कसं हटके स्टाईलने व्हावं यासाठी महिनोनमहिने धडपड सुरू असते. गेल्यावर्षीपासून जगभराला राहू, केतूच्या पलीकडे जाऊन ग्रासलेल्या कोरोनाने या विवाह सोहळ्यांनाही २० माणसांमध्ये बंदिस्त करून ठेवले आहे.
एप्रिल-मे म्हणजे विवाह सोहळ्यांचा हक्काचा महिना. या काळात शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने या दोन महिन्यांत सर्वाधिक विवाह साेहळे होतात आणि मुहूर्तदेखील जास्त असतात. यंदा मे महिन्यात तब्बल १६ मुहूर्त आहेत; पण जिल्ह्यात कोरोनाचे अक्षरश: थैमान सुरू आहे. रोज हजारावर रुग्ण येत आहेत, मृत्युदरदेखील वाढला आहे. अशा परिस्थितीत लग्न करायचे कसे, असा पेच आहे.
---
कांदेपोह्यांचा कार्यक्रमच बंद
प्रेमविवाह असेल तर वर-वधू संशोधनाचा मुख्य प्रश्नच मिटतो; पण पारंपरिक पद्धतीने ठरवून लग्न करायचे म्हणजे पसंतीतच किमान दोन-तीन वर्षे निघून जातात. अनेकांचे वर्षानुवर्षे हे संशोधन सुरू असते. आधीच वधू-वरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यातच कोरोना आडवा आल्याने जोडीदाराच्या शोधमोहिमेचा कांदेपोह्यांचा कार्यक्रमही बंद झाला आहे.
--
मे महिन्यातील मुहूर्त
१, २, ३, ४, ५, ८, १३, १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१.
साखरपुडा मुुहूर्त
१, ३, ४, ५, ८, १२, २०, २१, २२, २४, २८, ३०, ३१.
--
बँड, बाजा, बारात नाहीच..
सध्या २० माणसांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पडत आहे. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसांत कडक लॉकडाऊन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे घरगुती पद्धतीने होणारा विवाह समारंभदेखील आता पुढे ढकलावा लागणार आहे. त्यामुळे या महिन्यातील सगळे १६ मुहूर्त बँड, बाजा आणि बारातविनाच जाणार आहे.
---