महिन्याभरात डेंग्यूचे २९ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:17 AM2019-08-27T11:17:27+5:302019-08-27T11:18:20+5:30
महानगरपालिका प्रशासनाने महापूर ओसरल्यानंतर तात्काळ हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात सुदैवाने कोणत्याही आजाराची साथ पसरली नसली तरी गेल्या महिन्याभरात शहरातून डेंग्यूचे २९ रुग्ण, तर डेंग्यूसदृश २२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूची साथ नसली तरी शहरवासीयांनी यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने महापूर ओसरल्यानंतर तात्काळ हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात सुदैवाने कोणत्याही आजाराची साथ पसरली नसली तरी गेल्या महिन्याभरात शहरातून डेंग्यूचे २९ रुग्ण, तर डेंग्यूसदृश २२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूची साथ नसली तरी शहरवासीयांनी यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
कोल्हापूर शहरात दि. ५ आॅगस्ट रोजी महापुराचे पाणी शिरले होते. त्यानंतर पुढील सहा दिवस पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी स्थिर होती. पूर ओसरल्यानंतर विविध प्रकारचे ताप, गॅस्ट्रो, डायरिया, डेंग्यू यासारखे साथीचे रोग पसरतील, अशा भीतीमुळे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पूर ओसरेल तशी त्या त्या भागात स्वच्छता मोहीम हाती घेतली.
महापालिकेचे सुमारे सातशे कर्मचाऱ्यांसह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन महापूर आलेल्या परिसराची स्वच्छता करून तातडीने औषध फवारणी केली होती. आजही ही स्वच्छता मोहीम सुरूच आहे. त्यातच आता सूर्यकिरण पडत असल्यामुळे शहरात कोणतीही साथ पसरलेली नाही.
मात्र, दि. १ आॅगस्टपासून आजअखेरपर्यंत महापालिका हद्दीत २९ डेंग्यूचे, तर २२ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे काळजी वाटत असली तरी शहरात कोणतीही साथ नसल्याचा दावा महापालिकेने केलेला आहे. महापालिका प्रशासनाने अकरा आरोग्य केंद्रे व एक कुटुंब कल्याण केंद्रामार्फत शहरवासीयांना रोज मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत.
तापाचे तसेच डेंग्यूचे रुग्ण यांचे सर्वेक्षण केले जात आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातून होत असल्याने पाण्याच्या साठवण टाक्या, भांडी स्वच्छ कराव्यात, खासगी शौचालयांच्या टाकीवरील व्हेंटपाईपना जाळ्या बसवाव्यात, अशा सूचना दिल्या जात आहेत.