सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:47 AM2024-05-31T11:47:20+5:302024-05-31T11:50:23+5:30

''पंतप्रधानांचे महात्मा गांधी यांच्याविषयीचे विधान हास्यास्पद'' 

There will be a change of power in the country only because of the corruption of the rulers says Prithviraj Chavan | सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत आहेत. यातून जनतेची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याने जनता सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला वैतागली आहे. यामुळे देशात व राज्यात सत्तांतर होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

चव्हाण म्हणाले, पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांची वागणूक भयानक होती. राज्यात भ्रष्टाचारी सरकार कार्यरत आहेत. अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत असल्याचे यातून दिसून आले. जनता याला कंटाळली असून, लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानाचाही चव्हाण यांनी समाचार घेतला. मोदी हे निवडणूक काळात सतत प्रचारात व्यस्त होते. यामुळे त्यांना काय बोलावे हे सुचेनासे झाले आहे. त्यांना उपचाराची गरज असून त्यांचे विधान हास्यास्पद असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

दुष्काळासाठी काँग्रेसची जिल्हानिहाय बैठक

राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करून सरकारने निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करत चव्हाण यांनी काँग्रेसने समित्या स्थापन केल्या असून लवकरच जिल्हानिहाय दुष्काळाचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले.

पी. एन. यांना मंत्रिपद मिळायला हवे होते

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमदार पी. एन. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांना मंत्रिपद मिळायला हवे होते. मात्र, ते न मिळूनही ते कधी नाराज झाले नाहीत. लोकसभेला त्यांनी उभे राहावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. या लोकसभा निवडणुकीत स्वत: उमेदवार असल्यासारखे त्यांनी गाव ना गाव पिंजून काढत काँग्रेसचा प्रचार केला. अशा निष्ठावंत नेत्याच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, या शब्दांत चव्हाण यांनी पी. एन. यांना आदरांजली वाहिली.

Web Title: There will be a change of power in the country only because of the corruption of the rulers says Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.