‘कोल्हापूर लोकसभे’साठी ‘सरप्राईज चेहरा’ असेल - सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 12:05 PM2024-01-03T12:05:58+5:302024-01-03T12:06:44+5:30

जिल्हा नियोजनाच्या निधीबाबत न्यायालयात जाणार

There will be a surprise face for Kolhapur Lok Sabha says Satej Patil | ‘कोल्हापूर लोकसभे’साठी ‘सरप्राईज चेहरा’ असेल - सतेज पाटील 

‘कोल्हापूर लोकसभे’साठी ‘सरप्राईज चेहरा’ असेल - सतेज पाटील 

कोल्हापूर : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा जागावाटप अंतिम टप्यात असून जानेवारीच्या अखेरीस उमेदवार निश्चित केला जाईल. कोल्हापूर लोकसभेसाठी ‘सरप्राईज चेहरा’ असेल. सध्या जे पाच इच्छुक आहेत, त्यांपैकी एक असू शकतो, तिन्ही पक्षांपैकी जागा कुणाला मिळणार ? यापेक्षा भाजपविरोधात लढणे हीच आमची भूमिका असेल, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हा नियोजनच्या निधीबाबत प्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले, पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना राज्यातील कोणत्या लोकसभेच्या जागा हव्यात, याची यादी पाठवलेली आहे. आगामी काही काळात याची स्पष्टता येईल. महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न असणार आहेत.

जिल्हा नियोजनच्या निधीवाटपात तुम्ही सत्ताधारी म्हणून दहा पैसे जादा घ्या; पण विराेधकांना बाजूलाच करणार असाल तर ते कोणत्या घटनेत बसते? मंत्री म्हणून सगळ्यांना समान वागणूक देण्याची शपथ घेता; पण निधीवाटपात असा दुजाभाव का? कोल्हापूरची जिल्हा नियोजन समिती नाही, तर सत्तारूढ नियोजन समिती आहे. जिल्हा नियोजनच्या बैठकीत याबाबत पत्र देणार आहे. त्यात दुरुस्ती झाली नाही तर न्यायालयात दाद मागणार आहे.

राजू शेट्टी आमच्यासोबतच राहणार

‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांच्याशी आपली दोन वेळा प्राथमिक चर्चा झालेली आहे. हातकणंगलेसह राज्यातील इतर जागांबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू झालेली आहे. आमदार अपात्रतेचा निकाल झाल्यानंतर स्पष्ट येईल. तरीही जानेवारीअखेर उमेदवार निश्चित होतील. काही झाले तरी शेट्टी आमच्यासोबतच राहतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

शिंदे गटाच्या खासदारांना हवे ‘कमळ’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या सात खासदारांनी त्यांना ‘कमळ’ चिन्हावरच लढायचे आहे, असे लेखी दिल्याची माहिती माझ्याकडे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

जनता मतदानाची वाट बघतेय

केंद्र सरकारने काढलेल्या यात्रेला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. जनतेला खोटे चालत नाही, ती मतदानाची वाट बघत आहे. महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीलाच मतदान करील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: There will be a surprise face for Kolhapur Lok Sabha says Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.