भोगावतीची कुस्ती होणार, सारेच लांगा घालून तयार; बिनविरोधची नुसतीच हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 08:36 AM2023-11-04T08:36:43+5:302023-11-04T08:37:06+5:30
प्रत्येकाला हवे सत्तेचेच टॉनिक, कारखान्याच्या २५ जागांसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी गुरुवार (दि. ९)पर्यंत माघारीची मुदत आहे.
विश्र्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बिनविरोध करूया म्हणणारे सारेच त्यासाठी एकही पाऊल मागे घ्यायला तयार नसल्याने परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. राजकीय कुस्ती होणार असल्याने सारेच लांगा घालून तयार झाले आहेत. त्यातच माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी शुक्रवारी कारखान्यावर निवडणूक कार्यालय सुरू करून पॅनेलचा झेंडाही फडकावल्याने त्यांनीही लढण्याची तयारी केल्याचे स्पष्ट झाले.
कारखान्याच्या २५ जागांसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी गुरुवार (दि. ९)पर्यंत माघारीची मुदत आहे. कारखान्याचे २७ हजार ५६० मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल सरासरी तीन हजारांच्या मतांनी विजयी झाले होते. कारखान्यापुढे आर्थिक अडचणी असल्याने सर्वांनी एकत्रित येऊन निवडणूक बिनविरोध करावी अशी चर्चा सुरू होती; परंतु कारखाना कार्यक्षेत्रात विविध पक्ष आहेत त्यामध्ये प्रत्येकी दोन गट आहेत. निवडणूक बिनविरोध झाली की काही खर्च न करता आपसूक संचालक होता येते त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छेला सत्तेचे धुमारे फुटले आहेत. कारखान्यात आता काय राहिलं आहे, असे म्हणणारेच निवडणुकीची जंगी तयारी करू लागले आहेत. त्यातून गाठीभेठी, पॅनेल रचना सुरू झाली आहे.
संभाव्य आघाड्या अशा होणार..
१.सत्तारुढ आघाडीत काँग्रेस-शेकाप एकत्र : कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ आघाडीत राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना मानणारा गट, शेतकरी कामगार पक्षातील क्रांतिसिंह पवार, केरबा भाऊ पाटील, दत्तात्रय हणमा पाटील हे प्रमुख कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील प्रा. जालंदर पाटील हे एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने शेका पक्षाची शुक्रवारी सडोली येथे माजी आमदार संपतराव पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. पण त्यात काय निर्णय झाला नाही..दोन मतप्रवाह पुढे आले. सडोली खालसा गटातून आमदार पाटील यांच्या संबंधित सत्तारुढ आघाडीतून कुणीच अर्जच दाखल केला नसल्याने तिथे अक्षय अशोकराव पवार यांना राजकीय बळ दिले जाण्याची शक्यता ठळक आहे. असे झाल्यास पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बाबासाहेब देवकर यांचे राजकीय भवितव्य काय आणि त्यांची भूमिका काय असेल याविषयी उत्सुकता राहील. शेकापसोबत आल्याचा कारखान्यासोबतच आमदार पाटील यांना विधानसभेलाही फायदा होऊ शकतो. याशिवाय भाजपचे हंबीरराव पाटील व जनता दलाचे वसंतराव पाटील यांच्याशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेस आपल्याकडे बहुमत ठेवून इतरांना त्यांच्या ताकदीनुसार प्रतिनिधीत्व देऊ शकतो.
२. विरोधी दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडी : विरोधात धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडी आकारास येत आहे. ते विरोधातील अन्य गटांना एकत्रित घेऊन त्यांची मोट बांधतात की स्व:च्या हिंमतीवर पॅनेल उभे करतात ही उत्सुकता आहे. इतरांना सोबत घ्यायचे ठरल्यास शेकाप मधील एकनाथ पाटील, स्वाभिमानीतील जनार्दन पाटील, भाजपमधील दत्तात्रय मेडसिंगे आणि माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे बबन पाटील (कुरुकली), अजित पाटील (परिते), निवास पाटील (हळदी), राजेंद्र पाटील (हसूर) आणि माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांची मोट त्यांना बांधावी लागेल.
संपतराव पाटील यांनीच नेतृत्व करावे..
माजी आमदार संपतराव पवार हे कारखान्याच्या आणि विधानसभेच्या राजकारणातही सातत्याने आमदार पाटील यांच्या विरोधातच राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी आताही विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे, असाही मतप्रवाह आहे. परंतु पवार यांची प्रकृती आता पुरेशी साथ देत नाही. त्यामुळे ही जबाबदारी घेण्यास ते कितपत तयार होतात ही शक्यता धूसर आहे. या गटाचे नवे नेतृत्व क्रांतिसिंह पवार यांचा कल काँग्रेससोबत जाण्याचा आहे. राज्याच्या राजकारणातही काँग्रेस, शेकापची महाविकास आघाडी आहे.
मतदार संख्या अशी
गट नंबर १ कौलव : ४३७१
गट नंबर २ राशिवडे बुद्रुक : ५७४२
गट नंबर ३ : कसबा तारळे : ४१४२
गट नंबर ४ : कुरुकली : ५०५२
गट नंबर ५ : सडोली खालसा : ५३१५
गट नंबर ६ हसूर दुमाला : २४४३
व्यक्ती सभासद : ०२ (शाहू महाराज व प्रतापराव जीवनराव जाधव. यापैकी जाधव यांचे निधन)
ब वर्ग सभासद : ४९३