सीपीआरमधील आगीची होणार चौकशी, आवश्यक अग्निरोधक यंत्रणेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 06:00 PM2020-09-28T18:00:25+5:302020-09-28T18:03:16+5:30
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीची चौकशी होणार असून त्याकरिता डॉ. माळी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीसह इलेक्ट्रीकल विभागाने आगीच्या ठिकाणची पाहणी करून चौकशीला सुरुवातही केली.
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीची चौकशी होणार असून त्याकरिता डॉ. माळी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीसह इलेक्ट्रीकल विभागाने आगीच्या ठिकाणची पाहणी करून चौकशीला सुरुवातही केली.
सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमधील एका व्हेंटिलेटरने पेट घेतल्याने मोठी दुर्घटना ओढावली खरी, परंतु तत्काळ सर्व यंत्रणांनी गांभीर्य ओळखून परिस्थिती हाताळल्याने मोठी दुर्घटना टळली.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे तरीही त्याचे नेमके कारण शोधण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी डॉ. माळी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त केली.
दुपारी या समितीसह इलेक्ट्रीकल विभागाने प्रत्यक्ष ट्रामा केअर सेंटरमध्ये जाऊन पाहणी तसेच चौकशीला सुरुवात केली. सुरुवातीला एका रुग्णाला लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटरमधून धूर यायला सुरुवात झाली आणि काही सेकंदात पेटही घेतला. रुग्णाच्या नाका-तोंडाला लावलेले पाईप या प्लास्टिकच्या असल्याने त्याने तत्काळ पेट घेतला व सर्व खोलीभर धूर झाला, असे अग्निशमन दलाने सांगितले.