'पुन्हा दंगल होणार नाही, आत्ता शांतता प्रस्तापित करणे हे महत्वाचे काम'; दीपक केसरकरांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 11:16 PM2023-06-07T23:16:43+5:302023-06-07T23:28:00+5:30
कोल्हापूर शहरातील दिवसभराच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर हे तातडीने आज सायंकाळी कोल्हापुरात दाखल झाले.
कोल्हापूरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक पुकारली. या बंदला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाही. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमले. यावेली काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. सध्या शहरात तणाव निर्माण झाला आहे.
कोल्हापूर शहरातील दिवसभराच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर हे तातडीने आज सायंकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राज्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते, विविध संघटानांच्या नेत्यासोबत चर्चा केली. यानंतर दीपक केसरकरांनी माध्यामांशी संवाद साधत कोल्हापूर शहराचा विषय दंगलीपुरता संपला आहे, अशी माहिती दिली. या बैठकीला सर्व राजकीय पक्षांचे नेते व सर्व समाजातील लोक उपस्थित होते. यावेळी कोल्हापुरात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शपथ घेतली, असं दीपक केसरकरांनी सांगितले.
सदर झालेल्या दंगलीची पूर्ण चौकशी होणार असं दीपक केसरकर यांनी सांगितले. आत्ता शांतता प्रस्तापित करणे हे महत्वाचे काम आहे. आजच्या बैठकीतुन कोल्हापूर शांत होईल यावर माझा विश्वास आहे. सर्व संघटनाच्या सदस्यांनी हात वरती करून कोल्हापूर शांत राहील याबद्दल मला आश्वासन दिल्याचं दीपक केसरकरांनी सांगितले. दंगलखोर हे कोणाशी संबंधित नसतात. या प्रकाराचे वास्तव दंगलीच्या चौकशीतून समोर येईल, असं दीपक केसरकर यावेळी म्हणाले.
Maharashtra | Leaders of all political parties and people from all communities were present at the meeting. Oath has been taken in the name of Chhatrapati Shivaji Maharaj to maintain peace and harmony in Kolhapur: Kolhapur Guardian Minister Deepak Kesarkar https://t.co/trRBRTxTmrpic.twitter.com/Bb8U2NxM9j
— ANI (@ANI) June 7, 2023
कोल्हापूरमधील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.