कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील रस्ते होणार चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 11:15 AM2021-12-20T11:15:23+5:302021-12-20T11:16:33+5:30

संतोष मिठारी कोल्हापूर : जिल्ह्याच्या अर्थचक्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील रस्ते चकाचक ...

There will be roads in the industrial estates of Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील रस्ते होणार चकाचक

कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील रस्ते होणार चकाचक

googlenewsNext

संतोष मिठारी

कोल्हापूर : जिल्ह्याच्या अर्थचक्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील रस्ते चकाचक होणार आहेत. जानेवारीच्या अखेरपर्यंत या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोल्हापुरातील प्रादेशिक कार्यालयाने ठेवले आहे. रस्ते, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधा वाढल्याने औद्योगिक क्षेत्राची गती वाढणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उद्योग क्षेत्रातील कामांचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर या औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी एमआयडीसी कार्यालयाने पाऊलं टाकली आहेत. त्यात काही मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा टाकीची क्षमता वाढविणे आदींचा समावेश आहे. सर्व अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढविणे आदी कामांबाबतचे प्रस्ताव कोल्हापूर कार्यालयाने औद्योगिक विकास महामंडळाला पाठविले आहेत.

औद्योगिक वसाहतनिहाय कामांची स्थिती

शिरोली

येथील १८ किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. पाणीपुरवठा करणारी १९ किलोमीटरची जुनी पाइप बदलली आहे. बाराशे दशलक्ष लीटर क्षमतेची पाण्याची नवी टाकी (जलकुंभ) बांंधण्यात येणार आहे.

गोकुळ शिरगाव

येथील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. बाराशे दशलक्ष लीटर क्षमतेची पाण्याची नवी टाकी उभारली आहे. कणेरी फाटा येथील उड्डाणपुलापासूनचा दीड किलोमीटरच्या मुख्य आणि अन्य अंतर्गत १७ किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे.

कागल-हातकणंगले

येथील लक्ष्मी टेकडी चौक ते हुपरीतील जवाहर साखर कारखान्यापर्यंतच्या दहा किलोमीटरपर्यंतच्या मुख्य रस्त्यापैकी आठ किलोमीटरचे डांबरीकरण केले आहे. उर्वरित दोन किलोमीटरचे डांबरीकरण केले जाणार आहे. अडीच किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण आणि उर्वरित तीन किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. मुख्य चौकातील अतिक्रमणे काढली आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

गडहिंग्लज-हलकर्णी

या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये सध्या विविध ३५ प्रकारचे उद्योग कार्यन्वित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या वसाहतींमध्ये उद्योग सुरू करण्यास इच्छुक वाढत आहेत. या महिन्यात चार जणांचे भूखंड मागणीचे प्रस्ताव महामंडळाकडे आले आहेत.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधा सुधारणा करण्यात येत आहे. काही वस्तींमधील मुख्य, अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते, जलकुंभाची क्षमता वाढविणे आदी कामांबाबतचा प्रस्ताव महामंडळाला सादर केला आहे.  - राहुल भिंगारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, कोल्हापूर

Web Title: There will be roads in the industrial estates of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.