कोल्हापुरात पेट्रोलची टंचाई भासणार
By admin | Published: June 23, 2014 12:47 AM2014-06-23T00:47:56+5:302014-06-23T00:49:40+5:30
इराकमधील अराजकतेचा परिणाम : पंपावर लांब रांगा
कोल्हापूर : इराकमधील दहशतवादी अराजकतेचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. इराकमधून भारतात निर्यात होणारे तेल अपुरे येत असल्यामुळे पेट्रोलची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, आज रविवारी रात्री कोल्हापूर शहरातील बहुतांश: पेट्रोल पंप ‘क्लोज’ झाले होते तर पार्वती टॉकिज परिसर, आंबेवाडी पेट्रोल पंप परिसरात वाहनचालकांच्या पेट्रोलसाठी रांगाच्या रांगा लागल्या होत्या. उद्या (सोमवार) दुपारपर्यंत पेट्रोलची टंचाई भासणार असल्याचे पेट्रोल विक्रेत्यांनी सांगितले.
इराक दहशतवादी अराजकतेमुळे भारतात पेट्रोल व डिझेल अपुरे येत आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा साठा कमी झाला आहे.केवळ इंडियन आॅईलचा पेट्रोलचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी झाली होती. शहरात प्रत्येक वाहनचालकाला एक लिटरपर्यंत पेट्रोल देत होते.त्यामुळे काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवत होते. काल(शनिवार)पासून ही टंचाई जाणवत असल्याचे पेट्रोल विक्रेत्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)