ते साडेचार कोटी माझे नव्हेत : जी. डी. पाटील

By Admin | Published: April 5, 2016 01:23 AM2016-04-05T01:23:19+5:302016-04-05T01:23:19+5:30

चोरी प्रकरण : मुख्यालयात पिता-पुत्राची तीन तास चौकशी

They are not worth half a million. D. Patil | ते साडेचार कोटी माझे नव्हेत : जी. डी. पाटील

ते साडेचार कोटी माझे नव्हेत : जी. डी. पाटील

googlenewsNext

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील ‘ते’ साडेचार कोटी रुपये माझे नव्हेत. मुलगा आशुतोष व झुंझारराव सरनोबत हे नात्याने साडू आहेत. ते भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करतात. सरनोबत यांनी ते पैसे मुलग्याकडे ठेवायला दिले होते. एवढी मोठी रक्कम घरी ठेवणे योग्य नव्हते; म्हणून सुरक्षेसाठी ती शिक्षक कॉलनीतील बिल्डिंगमध्ये ठेवल्याची कबुली वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांनी चौकशीत दिली.
पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी त्यांची पोलिस मुख्यालयात रविवारी (दि. ३) तीन तास चौकशी केली. त्याचबरोबर त्यांचा मुलगा आशुतोष पाटील याच्याकडेही सोमवारी कसून चौकशी केली.
वारणा शिक्षक कॉलनी चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी मैनुद्दीन मुल्ला याने जबाबामध्ये शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील, लिपिक विजय कुंभोजकर, लेखापाल बी. बी. पाटील यांच्यासह शिपायांची नावे घेतली. सर्वांना गेल्या आठ वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यातील आर्थिक व्यवहारांची माहिती होती, असेही त्याने म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी लिपिक कुंभोजकर, लेखापाल पाटील यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांकडे यापूर्वी सखोल चौकशी करून त्यांचे जबाब घेतले. दरम्यान, शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिस मुख्यालयात आले. पोलिस निरीक्षक मोहिते यांनी तीन तास चौकशी केली. यावेळी पाटील यांनी वारणेतील साडेचार कोटी माझे नव्हेत. मुलगा आशुतोष व झुंझारराव पाटील हे नात्याने साडू आहेत.
सरनोबत पंधरा वर्षांपासून बांधकाम व्यवसायात आहेत. ते व मुलगा आशुतोष भागीदारीत व्यवसाय करतात. ते तीन एकर जागेची पाहणी करीत होते. त्यासाठी झुंझारराव सरनोबत यांनी साडेचार कोटी रुपये मुलाकडे ठेवायला दिले होते. त्याने ती वारणा शिक्षक कॉलनीतील इमारतीमध्ये ठेवल्याचे सांगितले. त्यांचा लेखी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला.
रक्कम बँकेत भरण्याचे आदेश
वारणा शिक्षण कॉलनीतील साडेचार कोटींची रक्कम सीलबंद करून कोडोली पोलिस ठाण्यामध्ये सशस्त्र पोलिस बंदोबस्तात ठेवली आहे. पन्हाळा न्यायालयाकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रकमेसंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार न्यायालयाने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये ही रक्कम लॉकरला ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले. त्यानुसार ही रक्कम आता या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत बँकेत ठेवली जाणार आहे.

Web Title: They are not worth half a million. D. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.