‘ते’ मृतदेह चुलत बहीण-भावाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:13 AM2017-11-18T01:13:44+5:302017-11-18T01:15:26+5:30
आंबोली : आंबोली-कावळेसाद येथील दरीत आढळलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. हे मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी-सावर्डे पाटणकर येथील श्रीधर सुरेश मोरे (वय २१) व त्याची चुलत बहीण नयना रमेश मोरे (१५) यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृत श्रीधर याच्या पँटच्या खिशात असलेल्या दुचाकीच्या चावीने, तर नयनाचा मृतदेह तिच्या अंगावरच्या कपड्याने ओळखण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यामागचे कारण आम्ही शोधून काढू, असे सावंतवाडीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी सांगितले.
आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथे गुरुवारी दोघांचे मृतदेह आढळून आले होते. ते मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली असता एक महिन्यापूर्वी कावळेसाद परिसरात पोलिसांना एक दुचाकी आढळून आली होती. ती दुचाकी राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील सुरेश मोरे याची होती. ती आंबोली पोलिसांनी मुरगूड पोलिसांकडे दिली होती. मात्र, दुचाकीवरून बेपत्ता असलेल्या श्रीधरचा तपास झाला नव्हता. श्रीधरबरोबरच नयना ही त्याची चुलत बहीण बेपत्ता होती. मात्र, शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा मृतदेह आंबोली-कावळेसाद येथील दरीतून बाहेर काढत असताना सांगेली येथील आपत्कालीन टिमला आणखी दोन मृतदेह दरीत असल्याचे आढळून आले होते. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी शोधमोहीम राबविली. त्यात या दोघांचेही मृतदेह आढळून आले. पोलिसांना यातील श्रीधरच्या पँटच्या खिशात दुचाकीची चावी आढळून आली. त्यावरून सावंतवाडी पोलिसांनी मुरगूड पोलिसांशी संपर्क केला असता सापडलेली दुचाकी ही सावर्डे येथील सुरेश मोरे यांची होती. त्यामुळे मिळालेला मृतदेह त्यांचा मुलगा श्रीधर यांचाच असावा, असा अंदाज बाळगला व शुक्रवारी मुरगूड पोलिसांसह त्यांच्या नातेवाइकांना सावंतवाडी येथे बोलावण्यात
आले. शुक्रवारी त्यांचे नातेवाईक सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचे फोटो तसेच कपडे व दुचाकीची चावी पाहिली.
त्यावरून हा श्रीधरचाच मृतदेह असल्याचे सांगितले, तर नयनाच्या अंगावर असलेले कपडे पाहून तिच्या नातेवाइकांनी हा नयनाचाच मृतदेह असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा रितसर पंचनामा केला व नातेवाइकांचेही जबाब नोंदवले.
घरात बोलतील म्हणून जिवाचा शेवट
श्रीधर व नयना हे तीन दिवस आंबोलीत राहिले. याची नोंद हॉटेलमध्ये आहे. भाऊ-बहीण असल्यानेच हॉटेलच्या मालकाने त्यांना ठेवले. मात्र, कावळेसाद पॉर्इंटवर ते फिरायला गेल्यानंतर आपण बरेच दिवस घरातून बाहेर असल्याने घरातील नातेवाइक ओरडतील, याच भीतीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्यांचे नातेवाइक व्यक्त करीत आहेत. त्याला पोलिसांनीही दुजोरा दिला.
ओळखीसाठी योग्य कारण दिल्याने ‘डीएनए’ नाही
श्रीधर व नयना यांच्या मृतदेहांच्या ओळखीबाबत योग्य कारण त्यांच्या नातेवाइकांनी दिल्यानेच आम्ही मृतदेहांची ‘डीएनए’ चाचणी करण्यासाठी पाठविले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. श्रीधर याच्या खिशात चावी, तर नयनाच्या कपड्यांवरून मृतदेह ओळखले. मृतदेहांचा सांगाडा शिल्लक होता; पण कपड्यावरून मृतदेह ओळखता येत होते, असेही पोलिसांनी सांगितले.
श्रीधरचे दहावीपर्यंतचे शिक्षण आंबोलीत
श्रीधर याचे दहावीपर्यंतचे शिक्षण आंबोलीतील पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. त्यामुळे त्याला आंबोलीची माहिती होती. त्यातूनच तो फिरायला आला होता, पण त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले याची माहिती घ्यावी लागेल, असेही पोलिसांनी सांगितले. आत्महत्या करणारे नात्याने भाऊ-बहीण होते. तसेच श्रीधर दहावीनंतर इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी बाहेर होता, असे पोलिसांनी सांगितले.
अनोळखी दुचाकी, तरी शोधाशोध झाली नाही
श्रीधर याने दुचाकी कावळेसाद पॉर्इंट येथे लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते, पण दुचाकी मिळाल्यानंतरही कावळेसाद परिसरात मुरगूड पोलिसांनी शोधाशोध का केली नाही? फक्त ते दुचाकी घेऊन कसे काय गेले? याची ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.