दिवस मावळतीला त्यांचे मन होते सैरभैर : पोराटोरांंच्या ओढीने डोळे डबडबतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:36 AM2019-02-24T00:36:55+5:302019-02-24T00:38:39+5:30
दिवस मावळतीला लागला की त्यांचे मन सैरभैर होते, शरीर जरी इथे असले तरी मन मात्र कधीच गावाकडे पोहोचते. पोरं, सुना नातवंडं काय करीत असतील, बाजारहाट झाला असेल का, चूल पेटली असेल का, गुराढोरांना वैरण पाणी मिळाले असेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर मनात
कोल्हापूर : दिवस मावळतीला लागला की त्यांचे मन सैरभैर होते, शरीर जरी इथे असले तरी मन मात्र कधीच गावाकडे पोहोचते. पोरं, सुना नातवंडं काय करीत असतील, बाजारहाट झाला असेल का, चूल पेटली असेल का, गुराढोरांना वैरण पाणी मिळाले असेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर मनात दाटते, डोळ््यांच्या कडा कधी ओलावतात हेदेखील कळत नाही. पोरांच्या गुरांच्या ओढीने डोळे डबडबतात, पण आपण सोसलेलं पोराबाळांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी उरावर दगड ठेवला आहे.
या व्यथा आहेत कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अकरा दिवसांपासून ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रकल्प व अभयारण्यग्रस्त महिलांच्या. चांदोली, वारणा, धामणी, सर्फनाला, उचंगी या प्रकल्पाच्या विस्थापितांच्या या आंदोलनात कर्त्या पुरुषांच्या बरोबरीने म्हाताऱ्या बायकांसह आठवी, नववीत शिकणाºया मुलीही गाठोड्यासह आंदोलनस्थळी बसून आहेत. कर्ता पुरुष, बाई एक दिवस घराबाहेर गेले तर कुटुंबाचा जगण्याचा क्रमच बदलतो. या बायाबापड्या तर अकरा दिवसांपासून गाव, घर, कुटुंबापासून लांब आहेत. रात्री उघड्यावरच झोपतोय, गावाकडून भाकरी आली तर जेवायचे नाही, तर पाणी पिऊन झोपायचे. प्रातर्विधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोय असली तरी अंघोळीसाठी पंचगंगा नदी गाठावी लागते. स्वत:च्या मालकीची शेतं, घरंदारं सोडून परक्या गावाचा आसरा घ्यावा लागला.
याला २0 वर्षे लोटली. तरी अजून घरं नाहीत, जमिनी नाहीत, पाणी नाही, हाताला रोजगार नाही तरी पण आम्ही जगण्याची लढाई लढतोय, शासन दखल घ्यायला तयार नाही, आता लई झालं, घेतल्या बिगर इथनं उठणारच नाय, मग गावाकडं आमच्या लेकराबाळाची आबाळ झाली तरी चालंल, पण हक्काचं घेऊनच उठणार, अशा पोटतिडकीने बनाबाई, हौसाबाई, सोनाबाई, जनाबाई बोलू लागतात. सर्वजणी डोळे पुसत त्याच त्वेषाने लढ्याचा निर्धार करतात.
घरदार वाºयावर सोडून
हौसाबाई पाटील सांगतात, माझं,पोरगं स्वत:च्या हाताने भात करून खातं, जैनावरांची वैरण पाणी सांभाळून शाळेला जाताना त्यातील भातावर थोडी चटणी टाकून आंदोलनस्थळी डबा पाठवतो. बनाबाई राऊत यांची सून नातवंडांना, गुराढोरांना सांभाळत जेवणाचा डबा पाठवून देते. जनाबाई कापसे यांची कथा तर यापेक्षा जरा वेगळी. सुना वेगळ्या राहतात. नवºयाचे निधन झाले आहे. एकटीच असल्याने आंदोलनस्थळी डबा आणून द्यायला कोणी नाही. आजूबाजूच्या बायाबापड्यांनी दिलेल्या जेवणावर पोटाची भूक भागवितात. गावाकडं मुलगी, मुलगा आहे, घरदार वाºयावर सोडून येथे येऊन बसले आहे. गावाकडची अशी आठवण सांगताना सोनाबाई उंडे कासावीस होतात.
राहिले दूर घर माझे...
प्रकल्प, अभयारण्यग्रस्त गेल्या अकरा दिवसांपासून कोेल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत. महिलांची संख्या यात लक्षणीय आहे, शरीराने जरी त्या आंदोलनस्थळी असल्या तरी त्यांचे मन मात्र गावाकडच्या आठवणीने गलबलून जाते.
रात्री उघड्यावरच झोपतोय, गावाकडून भाकरी आली तर जेवायचे नाही, तर पाणी पिऊन झोपायचे. अंघोळीसाठी पंचगंगा नदी गाठावी लागते. स्वत:च्या मालकीची शेतं, घरंदारं सोडून परक्या गावाचा आसरा घ्यावा लागला, तरीही आम्ही जगण्याची लढाई लढतोय.