नको कोरोनाचा संसर्ग, होवू दे खर्च; चारचाकी खरेदीकडे नागरिकांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 02:53 PM2021-12-29T14:53:23+5:302021-12-29T14:53:51+5:30
संतोष मिठारी कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेऐवजी स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ...
संतोष मिठारी
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेऐवजी स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कोल्हापुरात दुचाकी, चारचाकी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गेल्या आठ महिन्यात रोज १५४ कोल्हापूरकरांच्या दारी नवी गाडी आली आहे. त्यामुळे वाहन विक्रीची गती वाढू लागली आहे.
नोकरी, व्यवसाय, शेती, उद्योग आदी क्षेत्रातील कामासाठी स्वत:चे वाहन असावे, अशी मानसिकता कोल्हापूरकरांची झाली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनांची मागणी वाढली आहे.
यासह लग्झरियस सेगमेंटमधील चारचाकीच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी १५ टक्क्यांची वाढ आहे. चारचाकीची मागणी वाढली असली, तरी सेमिकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे त्यांच्या उत्पादनाची गती मंदावली आहे. त्यामुळे नव्या चारचाकीसाठी ग्राहकांना चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
महागड्या चारचाकींची क्रेझ
कोल्हापुरात महागड्या चारचाकींची मोठी क्रेझ आहे. त्यात अधिकतर २० लाखांपुढील लग्झरियस चारचाकींना चांगली मागणी आहे. या चारचाकींच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दक्षता म्हणून अनेक जण स्वत:चे वाहन खरेदी करत आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकींना मागणी वाढली आहे. सेमिकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे चारचाकींचे उत्पादन कमी असल्याने पुरवठा कमी होत आहे. कोल्हापूरच्या वाहन उद्योगातील उलाढालीची गती वाढत असल्याचे कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल चोरडिया यांनी मंगळवारी सांगितले.
नोव्हेंबरमध्ये खरेदीचा रेकॉर्ड
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी नोव्हेंबरमध्ये कोल्हापुरात सर्वाधिक ७७३० वाहनांची विक्री झाली आहे. त्यात दुचाकींची संख्या ६०८०, तर चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांची संख्या १६५० आहे.
मालवाहतूक ऑटोची विक्री वाढली
कोरोनामुळे कोल्हापुरात पॅसेंजर सेगमेंटमधील ऑटोरिक्षाची मागणी ३० टक्क्यांनी घटली, तर मालवाहतूक ऑटोरिक्षाची मागणी १५ टक्क्यांनी वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सीएनजी ऑटोरिक्षा खरेदीकडे कल वाढत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पॅसेंजर सेगमेंटमधील ऑटोची मागणी वाढणे अपेक्षित असल्याचे कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे सचिव नीलेश कदम यांनी सांगितले.
जिल्ह्यातील एकूण वाहने
एकूण चारचाकी वाहने : १,६७,०५५
१५ वर्षे जुनी चारचाकी वाहने : ४७,१७०
एकूण दुचाकी : १२,२१,८३७
१५ वर्षे जुनी दुचाकी वाहने : ३,६४,४००
एकूण व्यावसायिक वाहने : ७९,५४६
१५ वर्षे जुनी व्यावसायिक वाहने : ३३,३११
गेल्या आठ महिन्यांत वाढली वाहने : ३७,६५६
कोणत्या महिन्यात किती खरेदी?
महिना दुचाकी चारचाकी
एप्रिल ११९२ १०५०
मे ४ २९२
जून ५०५४ ८९२
जुलै ४५३४ १०८८
ऑगस्ट ३३८० १५७६
सप्टेंबर ३२२९ १५४७
ऑक्टोबर ४३२२ १७६६
नोव्हेंबर ६०८० १६५०