असहाय वृद्धाला सोडून ‘ते’ पळाले

By admin | Published: January 26, 2017 12:43 AM2017-01-26T00:43:22+5:302017-01-26T00:43:22+5:30

माणुसकीला काळिमा : शाहू नाक्यावरील सहृदयी लोकांनी ‘सावली’त केले दाखल

They run away from helpless old age | असहाय वृद्धाला सोडून ‘ते’ पळाले

असहाय वृद्धाला सोडून ‘ते’ पळाले

Next

मुरलीधर कुलकर्णी --कोल्हापूर --वेळ सोमवारी सायंकाळी ४.३० ची. शाहू नाक्याजवळच्या रस्त्यावर एका निर्मनुष्य ठिकाणी एक कार थांबली. कारमधून उतरलेल्या एकाने आजूबाजूचा कानोसा घेतला अन् अचानक त्याने कारमधील एका वृद्धाला अक्षरश: खेचून बाहेर काढले. कारमधून बाहेर पडताना तो वृद्ध गयावया करीत होता. मला सोडून जाऊ नका रे, तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही, म्हातारपणी मी आता कुठे जाऊ? असा त्याचा आक्रोश सुरू होता; पण त्या पाषाणहृदयी लोकांना त्याची दया आली नाही. वृद्धाला रस्त्यावर ढकलून देऊन ते आले तसे काही मिनिटांत निघून गेले.
घडल्या प्रकाराने तो वृद्ध अक्षरश: हबकून गेला होता. विमनस्क स्थितीत तो तिथेच बसून राहिला. हा प्रकार काही अंतरावर असलेल्या वैभव सोसायटीतल्या लोकांनी पाहिला अन् ते त्याच्याकडे धावले, विचारपूस करू लागले. मात्र, घडल्या प्रकाराने घाबरलेला वृद्ध काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमलेल्या लोकांपैकी एकाने घडला प्रकार नगरसेवक भूपाल शेटे यांना कळविला. शेटे यांनी व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे यांना बोलावून घेतले. रोकडे यांनी सुचविल्याप्रमाणे भूपाल शेटे यांनी संभाजीनगरातल्या सावली केअर सेंटरच्या किशोर देशपांडे यांना फोन लावला. देशपांडे यांनी त्या आजोबांचे पालकत्व स्वीकारण्यास होकार देताच उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दुंडगे येथील सामलिंग गवळी ?
सावलीत दाखल केल्यानंतर त्यांना पोटभर जेवण देण्यात आले. आपण आता सुरक्षित आहोत, याची थोडीशी जाणीव झाल्यावर त्यांनी सामलिंग गवळी असे स्वत:चे नाव सांगितले. ‘गडहिंग्लज तालुक्यातल्या दुंडगेचा मी राहणारा असून, मला कृष्णा, शंकर व लिंगाप्पा असे तीन भाऊ आहेत’ असे ते सांगतात; पण पत्नी, मुलांविषयी काहीच बोलत नाहीत. त्यांना सोडणारे कोण होते, याविषयी ते अवाक्षरही काढत नाहीत. त्यांच्याविषयी माहिती असल्यास संभाजीनगर येथील ‘सावली केअर सेंटर’शी संपर्क साधावा.

Web Title: They run away from helpless old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.